Thu, Mar 21, 2019 16:18होमपेज › Aurangabad › तीन मिनिटांत करा उद्योगाची नोंदणी

तीन मिनिटांत करा उद्योगाची नोंदणी

Published On: Feb 17 2018 2:05AM | Last Updated: Feb 17 2018 12:34AMऔरंगाबाद : विशेष प्रतिनिधी

मागासवर्गीय लघुउद्योजकांचा डेटा उपलब्ध नसल्याने धास्तावलेल्या केंद्रीय एससी-एसटी हब विभागाने शुक्रवारी परिषद घेऊन जनजागृती केली. उद्योग आधार या संकेतस्थळाचा वापर करून अवघ्या तीन मिनिटांत उद्योगाची नोंदणी करता येईल, तसेच मागासवर्गीय उद्योजकांकडून 4 टक्के वस्तू खरेदी न करणार्‍या सरकारी उपक्रमांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती या वेळी देण्यात आली.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले. केंद्रीय लघुउद्योग मंत्रालयाचे संचालक पी. जी. एस. राव, राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळाचे (एनएसआयसी) संचालक पी. उदय कुमार,  उप सरव्यवस्थापक पी. कृष्ण मोहन, आर. बी. गुप्ते,  शाखाधिकारी आकाश अवस्थी, बिम्टाचे अध्यक्ष नंदकिशोर रत्नपारखी, मसिआचे अध्यक्ष सुनील किर्दक, उद्योग केंद्राचे सरव्यवस्थापक दिलीप गुरलवार आदी या वेळी उपस्थित होते. 

मागासवर्गीय लघुउद्योजकांसाठी असणार्‍या केंद्राच्या योजनांचा पी. जी. एस. राव यांनी आढावा घेतला. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग आणि सरकारी विभागांना 20 टक्के वस्तूंची लघुउद्योगांमार्फत खरेदी करणे सक्तीचे करण्यात आले आहे. यापैकी 4 टक्के खरेदीही मागासवर्गीय उद्योजकांकडून करणे गरजेचे आहे, मात्र गेल्या तीन वर्षांत मागासवर्गीय उद्योजकांकडून खरेदीचे प्रमाण नगण्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मागासवर्गीय उद्योजक किती आहेत, ते कशाचे उत्पादन घेतात, याची माहिती उपलब्ध नसल्याने खरेदी करणे शक्य झाले नसल्याचे कारण दाखविण्यात येते. आता ही परिस्थिती बदलण्याची गरज असून, मागासवर्गीय उद्योजकांनी केंद्राच्या योजनांचा लाभ घेण्यास पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले.

उद्योजक म्हणून नोंदणी करण्यासाठी आता कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची तसेच कोणत्याही दलालास पैसे देण्याची गरज नाही. उद्योग आधार या संकेतस्थळावर आधार कार्डचा वापर करून अवघ्या तीन मिनिटांत नोंदणी करता येते. मागासवर्गीय उद्योजकांचे देयक एखाद्या संस्था अथवा कार्यालयाने थकविल्यास ‘एमएसएमई समाधान’ या संकेतस्थळावर तक्रार केल्यास व्याजासह तुमची रक्कम मिळवून दिली जाईल, अशी खात्रीही राव यांनी दिली.