Fri, Jul 19, 2019 17:55होमपेज › Aurangabad › बुधवारी दिसणार ‘रेड ब्लड सुपर ब्ल्यू मून’

बुधवारी दिसणार ‘रेड ब्लड सुपर ब्ल्यू मून’

Published On: Jan 29 2018 1:42AM | Last Updated: Jan 29 2018 1:23AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

येणारा बुधवार (दि. 31) खगोलप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. महिन्यातील दुसर्‍या पौर्णिमेमुळे ब्ल्यू मून, चंद्रग्रहणात ब्लडमून आणि 24 हजार कि. मी. ने पृथ्वीजवळ आल्याने आकाराने मोठा दिसणार आहे. 1866 नंतर पहिल्यांदाच या तिन्ही बाबी एकत्र जुळून येत असल्याने खगोल विश्‍वातील अनोखी घटना अनुभवता येणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

सूर्यास्त झाल्यावर बुधवारीही नित्यनेमाप्रमाणे पूर्वकडून चंद्र उगवेल. मात्र तो दररोजपेक्षा काहीसा मोठा आणि अनोख्या रंगात असेल. चंद्र खग्रास स्थितीमध्ये उगवणार असून पूर्व क्षितीजाजवळ दाट वातावरण असल्याने सुरुवातीचे सुमारे वीस मीनिटे चंद्र पाहायला मिळणार नाही. मात्र, त्यानंतर ‘ब्ल्यू मून’ व चंद्र ग्रहण असल्याने ‘ब्लड मून’ अशी दुर्मिळ खगोलीय घटना पाहायला मिळणार आहे. 31 जानेवारी रोजी चंद्र-पृथ्वी अंतर तीन लाख 60 हजार 985 कि. मी. असेल.

जे की सरासरी तीन लाख 84 हजार इतके असते. त्यामुळे चंद्रबिंब 14 टक्के मोठे दिसणार आहे. मात्र, भारतात ग्रहण सुरुवात झाल्यानंतर चंद्र उगवणार असल्याने ग्रहणाची सुरुवात पाहायला मिळणार नाही. चंद्र पृथ्वीच्या दाट छायेत असताना उगवत असल्याने महाचंद्र तांबूस (रेड सुपर मून) आणि आकाराने मोठा दिसणार आहे.

कधी व कशी असेल चंद्राची स्थिती

भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी 4.19 वाजता चंद्राचा पृथ्वीच्या विरळ छायेत प्रवेश होईल. 5.18 वाजता तो पृथ्वीच्या दाट छायेत येईल. 6.21 वाजता खग्रास ग्रहण स्थितीस सुरुवात होईल. 6.59 वाजता खग्रास ग्रहण मध्य, तर 7.37 वाजता ग्रहण स्थिती समाप्त होईल. रात्री 8.41 वाजता चंद्र पृथ्वीच्या दाट छायेतून बाहेर पडेल आणि 9.38 वाजता तो विरळ छायेतून मुक्त (ग्रहण मोक्ष) होईल. उंच इमारतीवर जाऊन ‘रेड ब्लड सुपर ब्ल्यू मून’चा आनंद घेऊ शकता.