Thu, Jun 27, 2019 12:10होमपेज › Aurangabad › पावत्या फाडून पैसे खिशात!

पावत्या फाडून पैसे खिशात!

Published On: Jun 02 2018 2:00AM | Last Updated: Jun 02 2018 12:12AMऔरंगाबाद : संजय देशपांडे

नक्कल मागणार्‍या नागरिकांकडून ठरावीक रक्कम आकारायची, मात्र त्याचा भरणाच कोषागार कार्यालयात करायचा नाही किंवा 100 रुपयांची पावती देऊन प्रत्यक्षात दुसर्‍या पावतीच्या आधारे 50 रुपयांचाच भरणा करायचा, अशी करामत जिल्हाधिकारी कार्यालयातील अभिलेखापाल एस. आर. बुर्‍हाडे यांनी केली आहे. 1 ते 27 एप्रिल या कालावधीत वसूल केलेले 16 हजार रुपये या महाशयांनी चक्क खिशात घातल्याचे आढळून आले आहे.  

जिल्हाधिकारी कार्यालयातील अभिलेख कक्षात जमीनविषयक अनेक महत्त्वाचे दस्तावेज आहेत. नागरिकांनी मागणी केल्यानंतर ठरावीक शुल्क आकारून त्यांना दस्तावेजाची नक्कल दिली जाते. लासूर स्टेशन येथील रहिवासी नंदलाल दरक यांना भूसंपादन प्रकरणासाठी नकलेची गरज होती. अभिलेखापालांनी 24 ऑगस्ट 2017 रोजी त्यांच्याकडून शंभर रुपये आकारून नक्कल दिली. दरक यांना ‘स’ मालिकेतील पुस्तिकेतील 7203275 या क्रमांकाची पावतीही देण्यात आली. या पावतीविषयी दरक यांना शंका आली. पावतीची रक्कम कोषागारात खरोखरच भरणा केली आहे काय, याची त्यांनी माहिती अधिकारात शहानिशा केली असता धक्कादायक बाब समोर आली. दरक यांच्याकडून ‘ज्ञ’ या मालिकेतील 9380638 या पावतीच्या आधारे 75 रुपयांचा भरणा करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे तक्रार केली. जिल्हाधिकार्‍यांनी लेखाधिकार्‍यांकडून तपासणी करून घेतली असता, अभिलेखापालाच्या अनेक करामती बाहेर आल्या.

16 हजारांचा भरणाच नाही
नकलेसाठी वसूल केलेल्या रकमा दोन दिवसांत शासन खाती जमा करण्याचा नियम असताना बुर्‍हाडे यांनी 1 एप्रिल ते 27 एप्रिल 2018 या कालावधीत वसूल केलेले 16 हजार रुपये 15 मेपर्यंत शासन खाती जमा केलेले नसल्याचे आढळून आले आहे.

वसुली जास्त, जमा कमी
नागरिकांकडून जास्तीची वसुली करायची अन् पैसे कमी जमा करायचे, असा प्रकारदेखील उजेडात आला आहे. सुनील काला, किशोर खिवंसरा, रमेश लिंभोरे, पी. डी. फड, जे. एस. बाकलीवाल, भगवान पगार, संदीप मोहनराव आदी नागरिकांकडून वसूल केलेल्या रकमा शासन खाती जमा केल्या नाहीत. 

अभिलेखापाल बुर्‍हाडे यांच्याविषयी नागरिकांनी केलेल्या तक्रारींची लेखाधिकार्‍यांकडून चौकशी करण्यात आली असून, लवकरच त्यांच्यावर कारवाई केली जाईल.


    - राजीव शिंदे, तहसीलदार, (सामान्य प्रशासन)