होमपेज › Aurangabad › विद्यार्थीनीवर बलात्‍कार : तरुण-तरुणीवर गुन्‍हा

विद्यार्थीनीवर बलात्‍कार : तरुण-तरुणीवर गुन्‍हा

Published On: Dec 21 2017 1:54AM | Last Updated: Dec 21 2017 1:54AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

आठवीच्या पंधरा वर्षीय तरुणीला बुलेटवरून म्हैसमाळला नेले. तेथे तरुणाने तिला गुंगीचे औषध दिले आणि लॉजवर नेऊन बलात्कार केला. ही घटना 13 डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी पीडितेच्या आईने क्रांती चौक ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून 19 डिसेंबर रोजी दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. 

झीनत आणि अब्दुल रहीम, अशी गुन्हा नोंद झालेल्या तरुण-तरुणीचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिल्लेखाना परिसरातील पंधरा वर्षीय मुलगी त्याच परिसरातील शाळेत आठवीच्या वर्गात शिकते. 13 डिसेंबर रोजी ती शाळेत गेली. दुपारी तिचे वडील तिला घेण्यासाठी गेले असता मुलगी शाळेत नसल्याचे समजले. त्यानंतर नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. सायंकाळी ती महावीर चौकात आढळून आली. तिच्या आईने विचारपूस केली असता या मुलीने धक्‍कादायक माहिती दिली.

ओळखीची तरुणी झीनत (रा. शहा बाजार) ही पीडितेला शाळेबाहेर भेटली. तिच्यासोबत आरोपी अब्दुल रहीम होता. झीनतने पीडितेला खुलताबादला जाऊ म्हणून तिला बुलेटवर बसविले. खुलताबादला गेल्यानंतर झीनत खाली उतरली. त्यानंतर आरोपी अब्दुल रहीम पीडितेला घेऊन म्हैसमाळला गेला. तेथे एका लॉजवर नेऊन त्याने तिला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. 

वडिलांना ठार मारण्याची धमकी

आरोपी अब्दुल रहीम याने पीडितेवर बलात्कार केल्यानंतर सायंकाळी तिला महावीर चौकात आणून सोडले. घडलेला प्रकार कोणालाही सांगू नको. नाही तर, तुझ्या वडिलांना ठार मारेन अशी धमकी त्याने दिली. मात्र, घाबरलेल्या विद्यार्थिनीने आईला घटना सांगितल्यानंतर त्यांनी क्रांती चौक ठाणे गाठून झीनत आणि अब्दुल रहीम या दोघांविरुद्ध अपहरण, बलात्कार आणि पोक्सा कायद्यान्वये गुन्हा नोंद केला. 

आरोपी झाला पसार

आरोपी अब्दुल रहीम आणि झीनत पसार झाले आहेत. क्रांती चौक पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला असून पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. आरोपीच्या शोधात पथक परभणीकडे रवाना झाल्याचेही पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विजय घेरडे करीत आहेत.