Tue, Jul 16, 2019 10:07होमपेज › Aurangabad › बेंटेक्सचे मंगळसूत्र घातले; लग्‍न झाल्याचे सांगून बलात्कार

बेंटेक्सचे मंगळसूत्र घातले; लग्‍न झाल्याचे सांगून बलात्कार

Published On: Apr 28 2018 1:52AM | Last Updated: Apr 28 2018 1:45AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

एका 25 वर्षीय पोलिस तरुणाची राँग नंबर लागून कायद्याचे शिक्षण घेणार्‍या 23 वर्षीय तरुणीसोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले अन् तरुणाने चक्‍क तिला लग्‍नाचे आश्‍वासन दिले. पुढे तिने लग्‍नाचा तगादा लावला तर त्याने एके दिवशी कुंकू लावून बेंटेक्सचे मंगळसूत्र तिच्या गळ्यात घातले अन् लग्‍न झाल्याचे सांगून पती-पत्नीसारखा तिच्यासोबत राहिला. यात त्याने तिचे लैंगिक शोषण केले. फसवणूक आणि बलात्कारप्रकरणी सिटी चौक ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. 

अमोल शिवाजी सोनटक्के (28, रा. नांदेड, ह.मु. भोईवाडा) असे आरोपी पोलिसाचे नाव असून तो चार्ली पथकात कार्यरत आहे. महिनाभरापासून तो आजारी रजेवर गेल्याचे तेथील सूत्रांनी स्पष्ट केले. या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 23 वर्षीय पीडिता शहरात कायद्याचे शिक्षण घेते. 30 जून 2017 रोजी रात्री तिला फोन आला. समोरून बोलणारा तरुण अमोल सोनटक्के हा होता. तो अनोळखी     होता, परंतु या राँग नंबरवर बोलताना त्यांची ओळख झाली.

या ओळखीतून ते नियमित फोनवर बोलू लागले. संवाद वाढल्यावर त्यांचे प्रेम फुलले. यात अमोलने तरुणीला लग्‍नाचे आमिष दाखविले. मात्र, तो लग्‍नासाठी टाळाटाळ करीत होता. तरुणीने तगादा लावल्यावर त्याने कुंकू लावून बेन्टेक्सचे मंगळसूत्र तिच्या गळ्यात घातले. लग्‍न झाले असे सांगून ते दोघे पती-पत्नीप्रमाणे राहिले. 

यात अमोलने तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. परंतु, आता तो तिला मारहाण करू लागला आहे. यात आपली फसवणूक झाली, हे लक्षात आल्यावर तरुणीने सिटी चौक ठाणे गाठून अमोलविरुद्ध फसवणूक आणि बलात्काराची तक्रार दिली. या प्रकरणी गुन्हा नोंद असून अधिक तपास सहायक निरीक्षक शैलजा जानकर करीत आहेत.