Mon, Jun 17, 2019 04:18होमपेज › Aurangabad › बिनपाण्याचे जिवंत केले सिंचन !

बिनपाण्याचे जिवंत केले सिंचन !

Published On: May 30 2018 2:14AM | Last Updated: May 30 2018 12:58AMऔरंगाबाद : संजय देशपांडे

रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेचे 11.76 दलघमी पाणी 2009 या वर्षी ब्रह्मगव्हाण सिंचन योजनेसाठी दिल्याने या योजनेचे पुनरुज्जीवन कसे करायचे, असा पेच जलसंपदा विभागासमोर निर्माण झाला आहे. पाणी उपलब्धतेची खात्री न करता या योजनेचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतल्याने आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे.

नाबार्ड आणि जिल्हा बँकेच्या अर्थसाह्यातून 1993 या वर्षी रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करण्यात आली.  गोदावरी नदीवरील कायगाव टोका येथून जायकवाडी धरणाच्या फुगवट्यातील पाणी भूमिगत पाईपलाईनद्वारे वैजापूर तालुक्यात आणण्याच्या या योजनेस यशही आले, मात्र आर्थिक घोटाळ्यामुळे 1999 या वर्षी ही योजना बंद पडली. योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी सभासदांच्या जमिनीवर जिल्हा बँकेच्या कर्जाचा डोंगर उभा राहिल्याने शेतकरी अडचणीत सापडले होते. राज्य सरकारने ही योजना 

पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय नुकताच घेतला असून, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या निधीतून 5 कोटी 79 लाख रुपये देण्यास मान्यताही दिली आहे.

2009 मध्येच वळविले पाणी

रामकृष्ण उपसा जलसिंचन योजना बंद पडल्यानंतर जलसंपदा विभागाने ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना टप्पा.क्र. 2 चे काम 2009 या वर्षी हाती घेतले होते.  ब्रह्मगव्हाण सिंचन योजनेसाठी 222 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, सद्यःस्थितीत 140 कोटी रुपये खर्च होऊन काम प्रगतिपथावर आहे. या योजनेसाठी 2009 मध्ये 90 दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध करून देण्यात आले असून, बंद पडलेल्या रामकृष्ण उपसा सिंचन योजनेच्या 11.76 दशलक्ष घनमीटर पाण्याचा यात समावेश आहे. रामकृष्ण उपसा सिंचन योजनेचे पाणी यापूर्वीच वळविण्यात आल्याने योजना पुनरुज्जीवित करण्यासाठी कोठून पाणी आणणार, असा प्रश्‍न यानिमित्त उपस्थित झाला आहे.