Wed, Apr 24, 2019 11:46होमपेज › Aurangabad › पालकमंत्री पदावरून कदम यांची उचलबांगडी 

पालकमंत्री पदावरून कदम यांची उचलबांगडी 

Published On: Jan 18 2018 1:59AM | Last Updated: Jan 18 2018 1:44AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

राज्य शासनाने बुधवारी शिवसेनेच्या कोट्यातील दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री तडकाफडकी बदलले. औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम यांची उचलबांगडी करीत त्यांना नांदेडचे पालकमंत्री करण्यात आले आहे, तर औरंगाबादच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी डॉ. दीपक सावंत यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. खा. चंद्रकांत खैरे यांच्यासोबत झालेल्या वादातूनच कदम यांची उचलबांगडी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
राज्यातील भाजप-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये पालकमंत्री नियुक्‍तीत जिल्ह्यांचे वाटप झालेले आहे. त्यानुसार औरंगाबाद आणि नांदेड हे दोन्ही जिल्हे शिवसेनेकडे आहेत. आतापर्यंत नांदेडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि औरंगाबादच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी पर्यावरण रामदास कदम यांच्याकडे होती. आता त्यात बुधवारी अचानक बदल करण्यात आला आहे. यामागे पक्षातील स्थानिक राजकारण कारणीभूत असल्याची चर्चा आहे. आता शासनाने खोतकर यांच्या जागी नांदेडला पालकमंत्री म्हणून रामदास कदम यांची नियुक्‍ती केली आहे. तर औरंगाबादच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे सोपविली आहे. 

सेनेतील दिग्गज मंत्री अशी ओळख असलेले रामदास कदम हे मागील तीन वर्षांपासून औरंगाबादचे पालकमंत्री होते, परंतु शिवसेनेचेच स्थानिक खासदार चंद्रकांत खैरे आणि कदम यांच्यात प्रचंड मतभेद होते. एकाच पक्षाचे असूनही दोघांकडून एकमेकांवर सतत कोणत्या ना कोणत्या निमित्ताने शरसंधान साधले जात होते. या दोघांनी अनेक वेळा एकमेकांवर जाहीररीत्या टीकाही केली. त्यामुळे कदम यांची उचलबांगडी होण्यात खैरे यांचा हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

नांदेडला तीन वर्षांत तीन पालकमंत्री
भाजप-शिवसेनेच्या तीन वर्षांच्या सत्ता काळात नांदेडला तीन पालकमंत्री लाभले. सुरुवातीला परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले होते, परंतु काही काळात त्यांना बदलून ही जबाबदारी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्याकडे दिली गेली. आता त्यांनाही बदलण्यात आले असून जिल्ह्याचे पालकमंत्रिपद पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याकडे आले आहे. राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी सध्या धोक्यात आहे. उच्च न्यायालयाने खोतकरांची आमदारकी नुकतीच रद्द ठरविली होती, परंतु नंतर त्याला सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे.