Wed, Jul 17, 2019 16:54होमपेज › Aurangabad › भाईंच्या उचलबांगडीने सेनेत अस्वस्थता 

भाईंच्या उचलबांगडीने सेनेत अस्वस्थता 

Published On: Jan 18 2018 3:56PM | Last Updated: Jan 18 2018 3:56PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

पालकमंत्री रामदास कदम आणि स्थानिक खासदार चंद्रकांत खैरे यांच्यातील मतभेदांमुळे शिवसेनेत स्थानिक पातळीवरील उभी फूट पडली होती. या वादाच्या पार्श्‍वभूमीवर कदम यांची पालकमंत्रिपदावरून उचलबांगडी झाली. त्यामुळे आता स्थानिक पातळीवर कदमांसोबतच्या एका मोठ्या गटात  अस्वस्थता पसरली आहे. न वर्षांपूर्वी जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी पर्यावरणमंत्री आणि सेनेचे दिग्गज नेते रामदास कदम यांची निवड झाली. 

कदम यांची निवड जिल्ह्यातील खैरे विरोधकांसाठी मोठा दिलासा होती. कारण कदम यांचा आक्रमक स्वभाव आणि मातोश्रीवरील वजन यामुळे खैरे विरोधकांसाठी ते पोषक होते. विशेष  म्हणजे कदम यांनी पालकमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारताच औरंगाबादच्या राजकारणात सक्रिय भूमिका निभावण्यास सुरुवात केली. हे खैरेंना काही पचनी पडेना.  त्यामुळे चंद्रकांत खैरे आणि कदम  यांच्यात सतत खटके उडत राहिले.  या दोन नेत्यांमधील वादात औरंगाबाद जिल्ह्यातही सेनेत उघड उघड खैरे आणि कदम असे दोन गट पडले. त्याआधी  खैरे यांच्याकडून दुखावलेले अनेक जुने पदाधिकारी कार्यकर्ते बाजूला फेकले गेले होते. त्यातील अनेकांना पालकमंत्री कदम यांनी पुन्हा प्रवाहात आणून महत्त्वाची पदे दिली. त्यामुळे खैरे यांचे प्रस्थ काहीसे कमी झाले होते. अलीकडच्या काळात दोघांमधील गटबाजी आणखीनच वाढली.

रामदास कदम यांनी खैरे विरोधकांची मोट बांधून त्यांना बळ देण्याचे धोरण कायम ठेवले. विशेषतः जिल्हाप्रमुख अंबादास  दानवे, माजी महापौर त्र्यंबक  तुपे, मनपातील माजी सभागृहनेता राजेंद्रजंजाळ, गजानन मनगटे, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांच्यासह काही नगरसेवकांना कदम यांचे  पाठबळ लाभले. खैरे यांनी केंद्राकडून मंजूर करून आणलेल्या समांतर जलवाहिनीवरूनही या दोन्ही नेत्यांतील बेबनाव आणखीनच वाढला होता. मनपाने समांतर जलवाहिनीचा खासगी ठेकेदारासोबतचा करार वर्षभरापुर्वी रद्द केला. त्यानंतर खैरे गटाकडून आता पुन्हा त्या ठेकेदाराला परत आणून ही योजना मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु पालकमंत्री कदम यांनी समांतरला नुकताच जाहीर विरोध दर्शविला. तसेच ठेकेदारसोबत  न्यायालयाबाहेर तडजोड कराल तर खबरदार असा इशाराही दिला होता. कन्नडचे वसेना आमदार हर्षवर्धन जाधव आणि खासदार चंद्रकांत खैरे यांच्यातील वादात देखील रामदास कदम यांनी हर्षवर्धन जाधव यांची बाजू घेतली होती. आता आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून शिवसेनेने रामदास कदम यांची उचलबांगडी केली आहे. त्यामुळे कदम यांच्यासोबत राहिलेल्या सेनेतील स्थानिक गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.