Tue, Apr 23, 2019 08:24होमपेज › Aurangabad › स्थायी समिती सभापतिपदी राजू वैद्य

स्थायी समिती सभापतिपदी राजू वैद्य

Published On: Jun 03 2018 1:12AM | Last Updated: Jun 03 2018 12:07AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

महानगरपालिका स्थायी समिती सभापतिपदी शिवसेनेचे राजू वैद्य यांची शनिवारी (दि.2) निवड झाली. अकरा विरुद्ध शून्य मतांनी ते  विजयी झाले. एमआयएमच्या उमेदवार शेख नर्गिस आणि त्यांच्या पक्षाचे इतर तीन सदस्य निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर दाखल झाले. त्यामुळे त्यांचे मत नोंदले गेले नाही. तर काँग्रेसचे एक सदस्य तटस्थ राहिले. राजू वैद्य हे याआधी म्हणजे 2006-07 मध्येही सभापती राहिलेले आहेत. मनपा स्थायी समितीत एकूण 16 सदस्य आहेत. मात्र निवडणूक प्रक्रिया सुरू झाली तेव्हा सभागृहात 12 सदस्यच हजर होते.     

वैद्य यांना दुसर्‍यांदा संधी

महानगरपालिका स्थायी  समिती सभापतिपदी शिवसेनेचे राजू वैद्य यांची निवड झाली. ते अकरा विरुद्ध शून्य मतांनी विजयी झाले. एमआयएमच्या उमेदवार शेख नर्गिस आणि त्यांच्या पक्षाचे इतर तीन सदस्य निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर दाखल झाले. त्यामुळे त्यांचे मत नोंदले गेले नाही. तर काँग्रेसचे एक सदस्य तटस्थ राहिले. राजू वैद्य हे याआधी म्हणजे 2006-7 मध्येही सभापती राहिलेले आहेत. 

पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 10 वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. मनपा स्थायी समितीत एकूण 16 सदस्य आहेत. मात्र निवडणूक प्रक्रिया सुरू झाली तेव्हा सभागृहात 12 सदस्यच हजर होते. एमआयएमचे चारही सदस्य यावेळी सभागृहात नव्हते. सभापती पदासाठी सेनेचे राजू वैद्य आणि एमआयएमच्या  शेख नर्गिस या दोघांचेच अर्ज होते. पीठासन अधिकार्‍यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पंधरा मिनिटांचा अवधी दिला. त्यानंतर प्रत्यक्ष मतदानास सुरुवात झाली.

राजू वैद्य यांना शिवसेना, भाजप आणि शहर विकास आघाडीचे मिळून एकूण 11 मते मिळाली. काँग्रेस सदस्य अब्दुल नावीद हे तटस्थ राहिले. ही प्रक्रिया संपत आल्यानंतर एमआयएमचे सदस्य मनपात दाखल झाले, परंतु उशीर झाल्यामुळे त्यांचे मतदान नोंदविले गेले नाही. शेवटी पीठासन अधिकार्‍यांनी वैद्य यांना विजयी घोषित केले. 

दरम्यान, मावळते सभापती गजानन बारवाल यांनी विरोधी पक्ष एमआयएम, काँग्रेस, अपक्ष आणि भाजपच्या भरवशावर निवडणूक मैदानात उतरण्याची तयारी चालविली होती. मात्र शिवसेना नेत्यांनी केलेली मनधरणी आणि भाजपने साथ देण्यास दिलेला नकार यामुळे बारवाल यांनी शेवटच्या क्षणी निर्णय बदलला. त्याचवेळी वैद्य यांचा मार्ग मोकळा झाला. 

निवड जाहीर होताच सेनेचा जल्लोष

सभापतिपदी वैद्य यांची निवड होणार हे आधीच निश्‍चित झाले होते. त्यामुळे विजयाचा जल्लोष करण्यासाठी सेनेचे शेकडो कार्यकर्ते मनपात सकाळपासूनच जमले होते. सेनेचे खासदार चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, आमदार संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, अंबादास दानवे हजर होते. निवड जाहीर होताच सभापती दालनात खैरे यांच्या हस्ते वैद्य यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महापौर नंदकुमार घोडेले, सभागृह नेता विकास जैन तसेच भाजपचे प्रवक्‍ते शिरीष बोराळकर, उपमहापौर विजय औताडे आदींची उपस्थिती होती.