Mon, Mar 18, 2019 19:17होमपेज › Aurangabad › राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती : पात्र विद्यार्थ्यांकडून ठरलेल्या प्रमाणातच शिक्षण शुल्क घ्यावे

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती : पात्र विद्यार्थ्यांकडून ठरलेल्या प्रमाणातच शिक्षण शुल्क घ्यावे

Published On: Aug 06 2018 1:59AM | Last Updated: Aug 08 2018 1:47AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीसाठी अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला (आई-वडील यांचे एकत्रित उत्पन्न), आधार कार्ड आदी कागदपत्रे लागणार आहेत. शिष्यवृत्तीसाठीची ऑनलाइन नोंदणी अद्याप सुरू झालेली नाही. मात्र, महाविद्यालयांनी प्रवेशावेळीच कागदपत्रे तपासून पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात प्रमाणानुसार सूट द्यावी. सूट दिली नसेल तर तेवढे शुल्क परत करावे, असेेे शासनाचे निर्देश आहेत. गेल्यावर्षी लाभ न घेऊ शकलेल्या पात्र विद्यार्थ्यांना यंदा अर्ज करता येणार आहे. 

आर्थिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्याकडे आवश्यक ती कागदपत्रे असल्यास त्याच्याकडून तो जेवढ्या सवलतीला पात्र आहे तेवढी सवलत वगळून उर्वरित शिक्षण शुल्क घ्यावे. सरसकट शिक्षण शुल्क घेतले असेल तर पात्रतेच्या प्रमाणानुसार ते परत करावे, असे आवाहन उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाने केले आहे.

दुसरीकडे तंत्रशिक्षण सहसंचालक कार्यालयाने शिष्यवृत्तीबाबत विद्यार्थ्यांच्या तक्रारींसाठी डॉ. गोविंद संघवई यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्‍ती केली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीला पात्र विद्यार्थ्यांकडून 50 टक्क्यांहून अधिक शुल्क घेतले असेल तर विद्यार्थी याबाबत डॉ. संघवई यांच्याकडे 9890185070 या भ्रमणध्वनीवर तक्रार नोंदवू शकतात. 

अशी आहे योजना

ही योजना विविध पदविका अभ्यासक्रमांसह अनेक बिगर व्यावसायिक आणि काही व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी लागू आहे. विद्यार्थ्यांना एकावेळी एकच शिष्यवृत्ती मिळेल. अर्धवेळ अभ्यासक्रम आणि दूरशिक्षण अभ्यासक्रमांसाठी ही योजना लागू नाही. एटीकेटी मिळून पुढच्या वर्गाला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळेल. तथापि, विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला असेल तर तेवढ्या वर्षापुरती शिष्यवृत्ती खंडित होईल. संबंधित विद्यार्थी उत्तीर्ण होऊन पुढच्या वर्गात गेल्यानंतर तो पुन्हा शिष्यवृत्तीला पात्र होणार आहे. 

निर्वाह भत्ता दरमहा 2 ते 3 हजार रुपये

अल्पभूधारक शेतकरी, नोंदणीकृत मजुरांचे पाल्य तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांहून कमी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना आहे. यात व्यावसायिक अभ्यासक्रमांना शिकणार्‍या विद्यार्थ्यांना दरमहा तीन हजार रुपये, तर बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना शिकणार्‍या मुलांना दरमहा दोन हजार रुपये निर्वाह भत्ता दहा महिन्यांसाठी मिळेल. 11 वी आणि 12 वीच्या पात्र विद्यार्थ्यांसाठी दरमहा एक हजार रुपये निर्वाह भत्त्याची सुविधा आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.