Thu, Aug 22, 2019 10:12होमपेज › Aurangabad › राज ठाकरे हाजीर हो; हजेरीमाफी अर्ज रद्द

राज ठाकरे हाजीर हो; हजेरीमाफी अर्ज रद्द

Published On: Jun 13 2018 1:32AM | Last Updated: Jun 13 2018 1:32AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

2008 मधील दंगल प्रकरणात कन्नड कोर्टाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नामंजूर केलेला हजेरीमाफीचा रद्द केलेला अर्ज जिल्हा व अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश एच. ए. पाटील यांनीही मंगळवारी (12 जून) कायम केला. त्यामुळे राज ठाकरे यांना सुनावणीला हजर व्हावे लागणार आहे. 

या प्रकरणात पिशोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डी. के. ठोंबरे यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, राज ठाकरे यांनी चिथावणी दिल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी 21 ऑक्टोबर 2008 रोजी कन्नड तालुक्यातील पिशोर परिसरात दगडफेक केली होती. तसेच पिशोर ते भारंबा जाणारी एसटी बस (एमएच 20, डी 4007) अडवून बसच्या काचा फोडून चार हजार रुपयांचे नुकसान केले होते व घोषणाबाजी केली होती. या प्रकरणी राज ऊर्फ स्वरराज श्रीकांत ठाकरे यांच्यासह सात आरोपींविरुद्ध भादंवि 109, 143, 336, 341, 427, तसेच सार्वजनिक मालमत्ता नुकसान कायदा आणि मुंबई पोलिस कायद्याच्या 135 कलमान्वये पिशोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

या प्रकरणात कन्नड येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टाने राज ठाकरे यांच्याविरुद्ध वॉरंट काढूनही ते हजर झाले     नव्हते. त्यानंतर ठाकरे यांनी कन्नड कोर्टात हजेरीमाफीचा अर्ज दाखल केला होता. तो कोर्टाने 13 एप्रिल 2018 रोजी नामंजूर केला होता. त्याविरुद्ध ठाकरे यांनी सेशन कोर्टात पुनर्विलोकन अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावरील सुनावणीवेळी, सहायक सरकारी वकील आर. सी. कुलकर्णी यांनी अर्ज मंजूर करण्यासाठी विरोध केला. मुळात हे प्रकरण जुने आहे व हजेरीमाफीसाठी दिलेली कारणे अत्यंत किरकोळ आहेत. जी कारणे आज लागू होत नाहीत. केवळ ठाकरे यांच्यामुळेच हे प्रकरण प्रलंबित राहिले. त्याचवेळी ठाकरे हे प्रत्यक्ष कोर्टात हजर झाल्याशिवाय प्रकरण पुढे चालू शकत नाही. खालच्या कोर्टाने दिलेला आदेश योग्य असून, त्यात बदल करू नये आणि हजेरीमाफीचा अर्ज नामंजूर करावा, असा युक्‍तिवादही सरकारी पक्षाच्या वतीने कोर्टात करण्यात आला. हा युक्‍तिवाद ग्राह्य धरून हजेरीमाफी रद्दचा अर्ज कोर्टाने नामंजूर केला.