होमपेज › Aurangabad › छावणीतील रेल्वे ओव्हरब्रिज खिळखिळा

छावणीतील रेल्वे ओव्हरब्रिज खिळखिळा

Published On: Jul 05 2018 1:36AM | Last Updated: Jul 05 2018 12:48AMऔरंगाबाद : सुनील कच्छवे

शहरातील नगरनाका येथील सुमारे चाळीस वर्षे जुना रेल्वे ओव्हरब्रिज जीर्ण झाला आहे. पुलाच्या छताचे प्लास्टर गळून पडून आतील लोखंडही पार उघडे पडले आहे. तसेच पुलाच्या दोन्ही बाजूंच्या खांबांना तडे गेले आहेत. त्यामुळे हा पूल कधीही कोसळण्याचा धोका आहे. दुसरीकडे रेल्वे प्रशासन मात्र या पुलाच्या धोकादायक स्थितीबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. 

मुंबईतील अंधेरी भागात मंगळवारी जुना रेल्वे ओव्हरब्रिज कोसळून तीन जण जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर धोकादायक बनलेल्या रेल्वे ओव्हरब्रिजचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. औरंगाबादेतही तीन रेल्वे ओव्हरब्रिज आहेत. यातील संग्रामनगर आणि रेल्वेस्टेशन येथील दोन्ही पूल नवीन आहेत, तर नगरनाका येथील रेल्वे ओव्हरब्रिज मात्र सुमारे चाळीस वर्षे जुना आहे. सध्या या रेल्वे ओव्हरब्रिजची अवस्था अतिशय वाईट बनली आहे. या पुलाच्या वरच्या बाजूचा एक कठडा कधीच तुटून पडला आहे. शिवाय पुलाच्या छताचे बांधकाम हळूहळू तुटून खाली पडत आहे. त्यामुळे पुलाच्या छताला मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यातील लोखंडी गज उघडे पडले आहेत. तसेच पुलाच्या दोन्ही बाजूचे खांब खिळखिळे झाल्यामुळे अव्याहतपणे सुरू असलेल्या जड वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. तरीही रेल्वे प्रशासनाने याकडे अजूनही लक्ष दिलेले नाही. पुलाच्या छताचे किती तरी तुकडे खाली रेल्वे रुळावर आणि रुळाच्या बाजूला पडलेले दिसत आहेत. 

हजारो वाहनांची वर्दळ : औरंगाबादकडून पुणे, मुंबईकडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे रस्त्यावरून छोटी, मोठी हजारो वाहने ये-जा करतात. खिळखिळ्या झालेल्या पुलावर जड वाहनांची संख्याही लक्षणीय आहे. पूल कोसळल्यास जीवित हानीचा धोका आहे.