होमपेज › Aurangabad › डीसीपी श्रीरामेंची हायकोर्टात धाव

डीसीपी श्रीरामेंची हायकोर्टात धाव

Published On: Jul 04 2018 2:12AM | Last Updated: Jul 04 2018 12:36AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

पोलिस महिलेच्या 22 वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या तक्रारीवरून दाखल झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्याचा एफआयआर रद्द करण्यासाठी आरोपी उपायुक्‍त (परिमंडळ-2) राहुल श्रीरामे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. मंगळवारी अ‍ॅड. अभिषेक कुलकर्णी यांच्यामार्फत त्यांनी फौजदारी अर्ज दाखल केला. बुधवारी (4 जुलै) या प्रकरणी सुनावणी ठेवण्यात आली आहे.  
29 जून रोजी उपायुक्‍त राहुल श्रीरामे यांच्याविरुद्ध एमआयडीसी सिडको ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. एका पोलिस महिलेच्या मुलीनेच त्यांच्याविरुद्ध तक्रार दिली. विशेष म्हणजे, अजूनही पीडितेचा शोध लागलेला नसून महिला निरीक्षक निर्मला परदेशी, उपनिरीक्षक क्रांती निर्मळ यांच्यासह चार पोलिसांचे पथक तिचा शोध घेत आहे. दरम्यान, तपास अधिकारी उपायुक्‍त विनायक ढाकणे यांनी सोमवारी घटनास्थळाची पाहणी करीत काही महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदविले आहेत. एकीकडे पोलिसांनी तपासाला सुरुवात केलेली असल्यामुळे आता पोलिस आपल्यापर्यंत पोहोचतील, अशी भीती निर्माण झाल्याने श्रीरामे यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यांनी अ‍ॅड. अभिषेक कुलकर्णी यांच्यामार्फत एफआयआर रद्द करण्याची विनंती करणारा फौजदारी अर्ज हायकोर्टात दाखल केला. 4 जुलै रोजी न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि व्ही. के. जाधव यांच्या खंडपीठात सुनावणी होणार आहे.

कॉल डिटेल्स तपासणार

बलात्काराची तक्रार व्हाट्सअ‍ॅपर पाठवून गायब झालेली पीडिताच सापडत नसल्यामुळे पोलिस तिचे कॉल डिटेल्स तपासणार आहेत. ती कोणाच्या संपर्कात होती? हे तपासण्यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. दरम्यान, यातून काही अधिकार्‍यांची नावे समोर येण्याची शक्यता व्यक्‍त होत आहे.