Tue, Mar 19, 2019 11:24होमपेज › Aurangabad › श्‍वानदंशाच्या लसीचा तुटवडा

श्‍वानदंशाच्या लसीचा तुटवडा

Published On: Jan 29 2018 1:42AM | Last Updated: Jan 29 2018 1:21AMऔरंगाबाद : सुनील कच्छवे

महानगरपालिका हद्दीत मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून दररोज वेगवेगळ्या भागात हे कुत्रे लोकांचे लचके तोडत आहेत. दुसरीकडे मनपाच्या रुग्णालयात मात्र श्‍वानदंशाच्या लसीचा तुटवडा आहे. शहरात मनपाचे 30 आरोग्य केंद्र आहेत. त्यातील एकाही रुग्णालयात श्‍वानदंशाची लस उपलब्ध नाही. त्यामुळे कुत्रा चावलेल्या रुग्णांना घाटीचा रस्ता धरावा लागत आहे.

शहरातील मोकाट कुत्र्यांच्या नियंत्रणाची जबाबदारी मनपा प्रशासनावर आहे. त्यामुळे पालिकेकडून या मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी केली जाते, परंतु मागील तब्बल दीड वर्ष नसबंदीचा हा उपक्रम बंद होता. परिणामी शहरातील मोकाट कुत्र्यांची संख्या चाळीस हजारांहून अधिक झाली असल्याचे मनपानेच जाहीर केले आहे. त्यातच आता अनेक भागात हे मोकाट कुत्रे लहान मुले, वयोवृद्ध, महिला आदींना चावा घेत सुटत आहेत. 

कुत्रा चावल्यावर संबंधित रुग्णाला रेबीजची लस देणे आवश्यक असते, परंतु आता मनपाच्या रुग्णालयांमध्ये ही लस मिळणेही कठीण झाले आहे. शहरात मनपाचे 30 आरोग्य केंद्र आहेत, परंतु सध्या या आरोग्य केंद्रांमध्ये रेबीजच्या लसींचा तुटवडा आहे. 

सिडको एन-8 सारख्या एखाद्या रुग्णालयातच ही लस मिळत आहे. आता तेथील लसीही संपल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे कुत्रा चावलेल्या रुग्णांना घाटीत पाठविले जात आहे. 

खरेदीकडे अधिकार्‍यांचे दुर्लक्ष

मनपाचा वार्षिक अर्थसंकल्प चौदाशे कोटी रुपयांवर गेला आहे. तरीदेखील आरोग्य सुविधांकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचे चित्र आहे. रेबीजच्या लसीची खरेदी मनपा पातळीवरच करावी लागते. त्यासाठी शासनाचे नियम आहेत. आधीच्या लसी संपण्याआधी नवीन लसीचा साठा मागवून घेणे गरजेचे आहे, परंतु मनपाच्या आरोग्य विभागातील अधिकारी यात दिरंगाई करीत आहेत. त्यामुळे शहरवासीयांना पालिकेच्या रुग्णालयात श्‍वानदंशाच्या लसी मिळणे कठीण झाले आहे.