Mon, Jan 21, 2019 00:39होमपेज › Aurangabad › पूर्व मतदारसंघात सेनेची स्वबळाची तयारी

पूर्व मतदारसंघात सेनेची स्वबळाची तयारी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने औरंगाबाद पूर्व मतदारसंघात स्वतःची ताकद वाढविण्यावर भर दिला आहे. सध्या भाजपकडे असलेल्या या मतदारसंघात सेनेने नव्याने सदस्य नोंदणी सुरू केली आहे. दोन महिन्यांत या मतदारसंघात तब्बल पन्नास हजार सदस्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

राज्याच्या सत्तेत एकत्र असूनही शिवसेना-भाजप युतीतील संबंध ताणलेले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून स्वबळाची तयारी करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून शिवसेनेने आता औरंगाबाद पूर्व या भाजपच्या मतदारसंघात सदस्य नोंदणीला सुरुवात केली आहे. आधीचा इतिहास पाहता युतीच्या जागा वाटपात शहरातील तीन मतदारसंघांपैकी औरंगाबाद पूर्व हा मतदारसंघ नेहमीच भाजपकडे राहत आलेला आहे. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेनेचे तेवढे प्राबल्य नाही. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत युतीत फिस्कटल्यानंतर सेनेने या ठिकाणी ऐनवेळी उमेदवार दिला; परंतु संघटन नसल्याने सेनेच्या उमेदवाराला खूपच कमी मते मिळाली. त्यामुळे आता शिवसेनेने या मतदारसंघात संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे. तसेच आता या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर सदस्य नोंदणीलाही सुरुवात केली आहे. सेनेचे पूर्व विधानसभा संघटक रेणुकादास वैद्य यांनी सांगितले की, मतदारसंघात दोन टप्प्यांत सदस्य नोंदणी केली जाणार आहे. त्याची सुरुवात नुकतीच झाली. दोन महिन्यांत पन्नास हजार सदस्य नोंदणी केली जाणार आहे.