Sun, Nov 18, 2018 13:50होमपेज › Aurangabad › मोदींच्या त्या वक्‍तव्याचा भजी विकून निषेध

मोदींच्या त्या वक्‍तव्याचा भजी विकून निषेध

Published On: Feb 03 2018 2:26AM | Last Updated: Feb 03 2018 2:26AMऔरंगाबाद :  प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याची घोषणा केली होती. याबाबत एका मुलाखतीदरम्यान त्यांनी पकोडे विक्री करून २०० रुपये रोज कमावणेही मोठा रोजगार असल्याचे सांगितले होते. त्यांच्या या वक्‍तव्याचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी जावेद कुरेशी मित्रमंडळाने अनोखे आंदोलन केले. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भजी तळून विकली. या अनोख्या आंदोलनाने नागरिकांचे चांगलेच लक्ष वेधले. 
देशभरातील तरुणांनी कठोर मेहनत करून पदवी, पदव्युत्तरचे शिक्षण घेतले. अनेकांनी एमबीए, बी.एड. यासह विविध पदव्या संपादित केल्या. मात्र शिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्यांना नोकर्‍यांची दारे काही खुली झालेली नाहीत. तर दुसरीकडे आयटी सेक्टरमध्ये नोकर्‍या देण्याची स्वप्ने दाखवली जात आहेत. नोकर्‍या देणे दूरच, पंतप्रधान पकोडे विक्रीचा स्टॉल टाकून रोजगार करण्याचा सल्ला देत आहेत. त्यांच्या या वक्‍तव्याचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी हे अनोखे आंदोलन करण्यात आले.  पंतप्रधानांनी देशातील सुशिक्षित बेरोजगारांची माफी मागावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.  

वोट हमारा, मर्जी तुम्हारी, नही चलेगी नही चलेगी. महिला बिल पास करा, भारत के नौजनवानों का एकही नारा... नही चाहिये मोदी दुबारा.., अशा घोषणाही यावेळी आंदोलकांनी दिल्या. आंदोलनात मित्रमंडळाचे अध्यक्ष जावेद कुरेशी, इंजिनिअर शेख मशरुफ, अफरोज पटेल, सय्यद समी, आवेज फारुकी, मतीन पटेल, साजीद पटेल यांच्यासह अनेकजण सहभागी झाले होते.