Sun, Jul 21, 2019 14:58
    ब्रेकिंग    होमपेज › Aurangabad › थकीत मालमत्ता करासाठी मनपाचे ‘अभय’

थकीत मालमत्ता करासाठी मनपाचे ‘अभय’

Published On: Feb 13 2018 2:53AM | Last Updated: Feb 13 2018 2:08AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

कर भरण्यासाठीची नागरिकांची उदासीनता विचारात घेऊन मनपा प्रशासनाने थकीत मालमत्ता करासाठी अभय योजना लागू करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार मूळ थकबाकीची रक्कम भरल्यास थकबाकीवरील व्याज आणि विलंब शुल्क माफ करण्यात येईल. मनपा आयुक्तांनी या योजनेचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेकडे मंजुरीस्तव पाठविला आहे.

शासनाच्या नियमानुसार मालमत्ता कराच्या थकीत रकमेवर दर महिन्याला 2 टक्के व्याज आणि विलंब शुल्क आकारले जाते. शहरात आधीच मालमत्ता कराच्या वसुलीचे प्रमाण अत्यल्प आहे. 2016-17 या आर्थिक वर्षात मनपाने 230 कोटी रुपयांच्या कर वसुलीचे उद्दिष्ट ठेवले होते, परंतु प्रत्यक्षात 89 कोटींचीच वसुली झाली. मालमत्ता कर वसूल न होण्यामागे शास्ती हे देखील एक कारण असल्याचेप्रशासनाचे मत आहे. 

सध्या मालमत्ता कराची मूळ थकबाकी 222 कोटी रुपयांची असून त्यावर 120 कोटी रुपयांचे व्याज आणि विलंब शुल्क आकारण्यात आलेले आहे.
चालू वर्षाची मागणी 90 कोटी रुपये इतकी आहे. त्यामुळे आता थकबाकी वसुलीसाठी मनपा प्रशासनाने पुणे मनपाच्या धर्तीवर शहरात अभय योजना राबविण्याचे ठरविले आहे.
याअंतर्गत थकबाकीची संपूर्ण रक्कम 31 मार्चपूर्वी भरल्यास त्या रकमेवरील व्याज पूर्णपणे माफ केले जाणार असून विलंब शुल्कातही 75 टक्के माफी दिली जाणार आहे. हा प्रस्ताव मनपा आयुक्त दीपक मुगळीकर यांनी सर्वसाधारण सभेकडे मंजुरीस्तव सादर केला आहे.
या प्रस्तावावर मनपाच्या सभेत 15 फेब्रुवारी रोजी चर्चा होणार आहे.

तीन वर्षांपूर्वीही झाला होता ठराव
सर्वसाधारण सभेने याआधी 21 फेब्रुवारी 2015 रोजी मालमत्ता करावरील संपूर्ण व्याज आणि विलंब शुल्क माफ करण्याचा ठराव मंजूर केला होता. त्यावेळी या ठरावाची अंमलबजावणी केल्यास मनपाचे सुमारे 22 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होणार होते. हेच कारण पुढे करीत तसेच या ठरावाची अंमलबजावणी केल्यास मालमत्ता कर वेळेवर भरण्याची आवश्यकता नाही असा संदेश जाईल, असे सांगत तत्कालीन मनपा आयुक्तांनी सर्वसाधारण सभेचा हा ठराव विखंडित करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठविला होता. मात्र यावेळी मनपा आयुक्तांनीच हा ठराव सभेसमोर ठेवला आहे.