Wed, Nov 13, 2019 13:35होमपेज › Aurangabad › मालमत्ता सर्वेक्षण मोहीम वेगात

मालमत्ता सर्वेक्षण मोहीम वेगात

Published On: Jul 09 2018 1:01AM | Last Updated: Jul 09 2018 12:03AMऔरंगाबाद : प्रतिनिधी 

महापालिकेच्या मालमत्ता सर्वेक्षणाच्या मोहिमेने आता वेग घेतला आहे. सुरुवातीच्या महिनारात 20 हजार मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले होते. त्यानंतर आता तीनच दिवसांत साडेचार हजार मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. 

शहरात सुमारे साडेतीन लाख मालमत्ता आहेत, मात्र त्यातील 2 लाख 24 हजार मालमत्ताच मनपाच्या रेकॉर्डवर आहेत. एवढ्याच मालमत्तांना पालिकेने मालमत्ता कर लावलेला आहे. उर्वरित मालमत्ता कराच्या जाळ्यातून अजूनही बाहेरच आहेत. त्यामुळे पालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी या मालमत्तांना कराच्या जाळ्यात ओढावे तसेच आधी नोंद असलेल्या मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करावे, अशी मागणी कित्येक वर्षांपासून होत होती. त्यानुसार पालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सुमारे 269 कर्मचार्‍यांच्या माध्यमातून 5 जूनपासून शहरातील संपूर्ण मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याची मोहीम हाती घेतली. यासाठी वॉर्डनिहाय पथके नियुक्त करण्यात आली आहेत. ही पथके घरोघरी जाऊन प्राथमिक स्तरावर मालमत्तांची मोजणी करीत आहेत. प्रत्येक पथकाला दररोज किमान 20 मालमत्तांची मोजणी करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. 

मालमत्ता धारकांकडून घेण्यात येणार्‍या कागदपत्रांचे व अर्जाचे स्कॅनिंग केले जात आहे. सुरुवातीच्या पंधरा दिवसांत रमजान महिना असल्याने 7 हजार 810 मालमत्तांची मोजणी झाली. त्यानंतरच्या पंधरा दिवसांत पथकांनी जोमाने काम केले. त्यामुळे महिनाभरात एकूण 20 हजार मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण झाले होते. त्यानंतरच्या तीन दिवसांत आता आणीखी साडेचार हजार मालमत्तांचे सर्वेक्षण झाले आहे. 33 दिवसांत एकूण 24 हजार 502 मालमत्तांचे सर्वेक्षण झाले असून, स्वतः आयुक्‍तांकडून सर्वेक्षणाची रोजची आकडेवारी तपासली जात आहे. आयुक्‍तांचा या मोहिमेवर वॉच असल्याने पथकेही वेगाने काम करत आहेत.