Sat, Apr 20, 2019 16:01होमपेज › Aurangabad › सेना नेत्याविरुद्ध माझ्याकडे पुरावे : आ. इम्तियाज  जलील

सेना नेत्याविरुद्ध माझ्याकडे पुरावे : आ. इम्तियाज  जलील

Published On: May 15 2018 1:33AM | Last Updated: May 15 2018 1:33AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

जुन्या औरंगाबादेतील दंगल पूर्वनियोजित कट होता. त्यासंबंधी पुरावे माझ्याकडे असून शिवसेना नेता स्वतः जाळपोळ करीत असल्याचा व्हिडिओही आहे. हे सर्व पुरावे मुख्यमंत्र्यांना देण्यात येतील. त्यांनी कारवाई केली तर ठीक, नसता आम्ही न्यायालयात जाणार, असा इशारा एमआयएमचे आ. इम्तियाज जलील यांनी दिला. ते सोमवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.

आ. जलील यांनी शिवसेनेवर दंगल घडविल्याचा आरोप केला. ही दंगल धार्मिक नसून निवडणुका जवळ आल्याने आणि गुंडागर्दीच्या वर्चस्वावरून घडल्याचे ते म्हणाले. लच्छू पहेलवाल या दंगलीच्या मागील मास्टरमाइंड असल्याचा गंभीर आरोप आ. जलील यांनी केला. तसेच, पोलिसही दंगेखोरांना मदत करीत होते. सेना पदाधिकारी गाड्या जाळत असल्याचे सीसीटीव्ही आणि मोबाइल कॅमेर्‍यात शूटिंग झालेले ठोस पुरावे आपल्याकडे आहेत. हे सर्व पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडून दंगलखोर आणि त्यांना मदत करणार्‍या पोलिसांवर कारवाईची मागणी केली जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांकडून कारवाई न झाल्यास न्यायालयात जनहित याचिका दाखल केली जाईल. त्या ठिकाणी पोलिसांच्या भूमिकेचा पर्दाफाश होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, अशी मागणी आ. जलील यांनी केली. तसेच, आम्ही नुकसानग्रस्तांना मदत करण्यास कटिबद्ध असून दुकाने उभी करून दिली जातील, असा शब्दही जलील यांनी दिला. जर, खैरे यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते उघड करावेत, असे खुले आव्हान त्यांनी दिले.

अन् त्यांचीच दुकाने कशी जळाली...

ज्यांना दुकाने खाली करण्यासाठी धमकावले होते त्यांचीच दुकाने जाळण्यात आली. गुलमंडीवर एकाच दुकानाला आग कशी लागली, असा सवालही आ. जलील यांनी केला. या दंगलीची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आ. जलील यांनी केली.