Mon, Apr 22, 2019 11:38होमपेज › Aurangabad › निवृत्तीच्या दिवशी प्राध्यापकाचा अवमान

निवृत्तीच्या दिवशी प्राध्यापकाचा अवमान

Published On: Feb 01 2018 1:42AM | Last Updated: Feb 01 2018 1:19AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रशासन किती मुर्दाड आहे याचा प्रत्यय बुधवारी आला. प्रशासनाने सेवागौरव समारंभासाठी प्रा. डॉ. श्रीराम निकम यांना आमंत्रित केले; मात्र, विद्यापीठाचा एकही अधिकारी समारंभाला उपस्थित राहिला नाही. त्यामुळे समारंभावर बहिष्कार घालून ते निघून गेले. रात्री उशिरापर्यंत त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू होते.22 वर्षे विद्यापीठाची सेवा केल्यानंतर शेवटच्या दिवशी निकम यांच्या वाट्याला आलेली ही वंचना हृदय विदीर्ण करणारी आहे.

राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. निकम बुधवारी सेवानिवृत्त झाले. प्रथेप्रमाणे प्रशासनाने महात्मा फुले सभागृहात त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन केले. यासाठी दुपारी चारची वेळ ठेवली होती. डॉ. निकम पावणेचार वाजता आले. सभागृहात राज्यशास्त्राचे विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते. तथापि साडेचार होऊनही एकही अधिकारी न फिरकल्यामुळे कुजबुज सुरू झाली. विद्यार्थी विकास संचालक डॉ. मुस्तजीब खान केवळ डोकावून गेले. पाच वाजले तरी एकाही अधिकार्‍याचा पत्ता नव्हता. त्यामुळे दुखावलेले निकम निघून गेले. थोड्या वेळाने कुलसचिव डॉ. साधना पांडे सभागृहात आल्या. मात्र, रिकामे सभागृह पाहून माघारी फिरल्या. एव्हाना घटनाक्रम कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्यापर्यंत गेला होता. त्यांनी विशेष कार्य अधिकारी डॉ. वाल्मीक सरवदे यांना लक्ष घालण्यास सांगितले. ‘आजचे जाऊ द्या. उद्या आम्ही मोठा समारंभ ठेवून तुम्हाला निरोप देऊ, ’अशी मखलाशी डॉ. सरवदे यांनी केली. मात्र, निकम यांच्या भावना एवढ्या तीव्र होत्या की, सरवदे अधिक शिष्टाई करू शकले नाहीत. 

ही तर मानहानी 

निरोप समारंभासाठी आमंत्रित करून स्वतःच त्याकडे पाठ फिरवायची हा मानहानीचा प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. उल्हास उढाण यांनी व्यक्‍त केली. 

इतर अधिकारी काय करत होते

कुलगुरू अर्थसंकल्पाच्या बैठकीत व्यग्र असतील तर इतर अधिकारी काय करत होते. उद्या त्यांच्याही निरोपाची वेळ आहे. त्यांच्यासोबत असे घडले तर, असा सवाल एसएफआयचे जिल्हा सचिव लोकेश कांबळे यांनी केला. गुरुवारी आम्ही विभागात त्यांचा विद्यापीठाहून अधिक मोठा निरोप समारंभ घेणार आहोत, असेही कांबळे म्हणाले.