Fri, Jul 19, 2019 01:35होमपेज › Aurangabad › सात एकरात काढले 120 क्‍विंटल कपाशीचे उत्पादन 

सात एकरात काढले 120 क्‍विंटल कपाशीचे उत्पादन 

Published On: Jan 19 2018 1:48AM | Last Updated: Jan 19 2018 12:41AMसिल्लोड : अमोल नाईक

राज्यात कपाशी पिकावर प्रादुर्भाव झालेल्या शेंदरी बोडअळीमुळे शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या पिकाच्या नुकसान भरपाईच्या मागणीसाठी विरोधी पक्षांनी विविध प्रकारचे आंदोलन करून सरकारला आर्थिक मदत देण्यास भाग पाडले. तर दुसरीकडे सिल्‍लोडच्या एका शेतकर्‍याने सेंद्रिय पद्धतीने शेती करून अत्यंत कमी खर्च करून सात एकरांत 120 क्‍विंटल कपाशीचे उत्पादन काढून विक्रम केला आहे. सरासरी सहा लाख रुपयांचे उत्पन्न त्यांनी काढले. सेंद्रिय शेतीचा हा प्रयोग कापूस उत्पादक शेतकर्‍यांसाठी मार्गदर्शक ठरणार असून त्याने बोंडअळींच्या समस्येतून बाहेर पडण्यास मोठी मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्‍त केली जात आहे.  

शहरानजीकच सुशील सुभाष जैन यांची शेती आहे. कपाशी पिकावर पडत असलेल्या सेंदरी बोंडअळींची समस्या त्यांनी गेल्या वर्षी अनुभवली होती. हजारो रुपयांचे महागडे रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर करूनही बोंडअळीचा नायनाट होऊ शकला नाही. यामुळे यंदा त्यांनी सात एकर क्षेत्रांवर जून महिन्यात बिटी कपाशीची ठिबकवर लागवड केली. ही लागवड पूर्णपणे सेंद्रिय खते व औषधी वापरून करण्याचे नियोजन हाती घेतले. कपाशीची लागवड केल्यानंतर दर पंधरा दिवसाला गोमूत्रात लसून, हिरवी मिरची, लिंबाचा पाला यांचे मिश्रण करून ते ठिंबकद्वारे दिले. पेरणीनंतर कंपोष्ट खताची मात्रा दिली. 50 किलोच्या या खताच्या 140 बॅग वापरल्या, तसेच गोमुत्रासोबतच, बेसनपीठ, काळा गूळ यांचे मिश्रण म्हणून ते वापरत गेले, मात्र कपाशीत तणनाशकाचा वापर केला नाही. दोन वेळा कपाशीची निंदणी केली. पाणी कमी असताना ठिंबकद्वारे कमी पाण्यात कपाशी पीक जोपासले. 

कमी खर्चात बंपर उत्पन्न!
 सेंद्रिय पध्दतीने लागवड केलेल्या कपाशी पिकाला जैन यांनी 37 हजार रुपयांचे कंपोष्ट खत व 15 रुपये लिटर प्रमाणे गोमूत्र व पाच हजार रुपयांचे इतर साहित्य आणि 14 हजार रुपये निंदणीसाठी लागले. एवढ्या कमी खर्चात 120 क्किंटल कपाशीचे उत्पादन सात एकरांत काढून जैन यांनी यश मिळविले. गतवर्षी जैन यांच्या शेतात बोंडअळींने कापूसच खाल्ला होता. हाती काहीच न आल्याने बाधीत झालेल्या कपाशीच्या पर्‍हाटी त्यांनी उपटून त्या जाळून टाकल्या. याचा फायदा त्यांना यंदा मिळाला. 

गेल्या वर्षी कपाशी पिकावर झालेल्या बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे माझे मोठे आर्थिक नुकसान झाले. याचा धडा घेत मी यावर्षी तीन बाय एक वर सात एकरांत बिटी कपाशीची लागवड केली. सेंद्रिय पध्दतीनेच कपाशीचे उत्पन्न घ्यायचे ठरविले. लिहाखेडी येथील गोशाळेतून गोमूत्र व सेंद्रिय खत आणून त्याचा वापर पुरेपूर केला. हा प्रयोग कपाशीवरील पडणार्‍या बोंडअळीस रोखणारा ठरला आहे. अत्यंत कमी खर्चात 120 क्किंटल कपाशीचे उत्पादन मी काढले. 
सुशील जैन, शेतकरी, सिल्‍लोड.