Thu, Sep 20, 2018 13:11होमपेज › Aurangabad › साखर आयुक्‍तांच्या ‘त्या’ आदेशाला न्यायालयात आव्हान

साखर आयुक्‍तांच्या ‘त्या’ आदेशाला न्यायालयात आव्हान

Published On: Dec 03 2017 2:39AM | Last Updated: Dec 03 2017 1:44AM

बुकमार्क करा

पैठण : प्रतिनिधी

संत एकनाथ साखर कारखाना सचिन घायाळ शुगर मिलला देण्याचा साखर आयुक्‍तांचा निर्णय एकतर्फी असून त्यास आम्ही जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. याबाबत जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत सचिन घायाळ मिलला कारखान्याचा ताबा देण्याचा प्रश्‍नच नाही, असे या कारखान्याचे चेअरमन तुषार पाटील शिसोदे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

शिसोदे म्हणाले, सचिन घायाळ शुगर मिलने करारभंग केलेला असून शेतकरी, कामगार व ऊस तोडणीचे पैसे थकवले आहेत. सचिन घायाळ शुगर मिलला ताबा देण्याचा साखर आयुक्‍तांचा निर्णय संत एकनाथ कारखान्याचे कोणतेही म्हणणे ऐकून न घेता साखर आयुक्‍तांनी घेतला आहे. त्यामुळे या निर्णयाविरुद्ध 28 नोव्हेंबर 2017 रोजी कारखान्याने जिल्हा न्यायलयात अपिल दाखल करून साखर आयुक्‍त यांचे आदेश रद्द करण्याबाबत विनंती केली आहे. याप्रकरणी कलम 36 अन्वये जोपर्यंत कलम 34 अन्वये दाखल केलेले अपील नामंजूर होत नाही, तोपर्यंत साखर आयुक्‍तांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करता येत नाही, असा दावा चेअरमन शिसोदे यांनी यावेळी केला. कलम 36 अन्वये कारखान्याने विहीत मुदतीत अपील दाखल केलेले आहे. त्यामुळे ताबा देण्याचा प्रश्न येत नाही, अशी माहिती शिसोदे यांनी यावेळी दिली.