Sat, Feb 23, 2019 10:14होमपेज › Aurangabad › भर ग्रामसभेतून अध्यक्षांनी ठोकली धूम

भर ग्रामसभेतून अध्यक्षांनी ठोकली धूम

Published On: Dec 15 2017 2:43AM | Last Updated: Dec 15 2017 12:52AM

बुकमार्क करा

सिल्लोड : अमोल नाईक 

भोकरदन तालुक्यातील आव्हाना या गावाचा सिल्लोड तालुक्यात समावेश करण्यात यावा या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून गावकरी प्रयत्नशिल आहेत. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी गुरुवारी (दि.14) पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पी. आर. मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामसभा घेण्यात आली. मात्र अध्यक्ष भर सभेतून निघून गेल्याने हा निर्णय तसाच राहिला. खबरीदारीचा उपाय म्हणून येथे उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर वसावे, पोलिस निरीक्षक डी. एम. चौधरी यांच्यासह 25 पोलिस कर्मचार्‍यांचा तगडा बंदोबस्त होता. 

आव्हाना हे गाव भोकरदन तालुक्यात आहे, मात्र येथील गावकर्‍यांचा संबंध भोकरदनऐजवी जवळ असल्याने सिल्लोडशी जास्त येतो. सिल्लोडहून हे गाव अवघे सात किलोमीटर अंतरावर आहे. यामुळे आव्हाना गावचा समावेश सिल्लोड तालुक्यात करण्याची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून ग्रामस्थ प्रशासनाकडे करत आहेत. दरम्यान,यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी गुरुवारी (दि.14) पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पी.आर. मोरे व डी. व्ही. इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामसभा घेण्यात आली. सकाळी साडेदहा वाजता ग्रामसभेस सुरुवात झाली. सभेचा कोरम पूर्ण झाल्यानंतर सभेत  आव्हाना गावचा सिल्लोड तालुक्यात समावेश का करण्यात यावा आणि भोकरदन तालुक्यात का नसावा, याबाबत काही ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यासाठी अनुक्रम दोन रांगा लावण्यात आल्या होत्या. खबरीदारीचा उपाय म्हणून येथे उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर वसावे, पोलिस निरीक्षक डी. एम. चौधरी यांच्यासह 25 पोलिस कर्मचार्‍यांचा तगडा बंदोबस्त होता. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण होेते.  

ग्रामसभेत राजकारण घुसले 

आव्हाना हे गाव भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या तालुक्यातील असून  तेथील लोकसंख्या चार हजार आहे. आमच्या गावाचा समावेश सिल्‍लोड तालुक्यात करण्यात यावा, अशी जोरदार मागणी यावेळी गावकर्‍यांनी केली. यामुळे या मागणीला मोठे महत्व प्राप्त झाले, मात्र आव्हाचा गावाचा समावेश सिल्‍लोड तालुक्यात झाल्यास  या गावाचा विकास करण्यात आपण निष्क्रिय ठरलो, असा संदेश सर्वत्र जाईल, या भीतीमुळे याच पक्षाच्या काही राजकारण्यांनी ग्रामसभेतील अध्यक्षांना धमकावले की काय, अशी चर्चा सभास्थळी गावकरी दबक्या आवाजात करीत असल्याचे ऐकायला मिळाले. या ग्रामसभेत मोठे राजकारण झाले असावे, असेच या वरून दिसून येते. 

आव्हाना गावचा समावेश सिल्लोड तालुक्यात करण्यात यावा, या मागणीसाठी  बोलविण्यात आलेल्या ग्रामसभेतून सभेचे अध्यक्ष निघून गेले. यामुळे उपस्थित ग्रामस्थांचे म्हणने ऐकूण घेत तशी प्रोसिंडिंग बनविली. 265 गावकर्‍यांनी सिल्लोड तालुक्यासाठी उत्सुकता दाखविली. झालेल्या प्रकाराची माहिती वरिष्ठांना कळविण्यात आली असून सभेस अध्यक्षच नसल्याने कोणत्याही निर्णयाविना सभा मुख्य मागणीसाठी अनिर्णीत राहिली.

बालाजी सरवदे, ग्रामविकास अधिकारी