Wed, Jul 08, 2020 18:21होमपेज › Aurangabad › चोरीच्या मोबाइलवरून वकिल महिलेशी अश्‍लील चॅटिंग

चोरीच्या मोबाइलवरून वकिल महिलेशी अश्‍लील चॅटिंग

Published On: Jan 19 2018 10:20PM | Last Updated: Jan 19 2018 10:20PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

चोरीच्या मोबाइलवरून वकिल महिलेशी अश्‍लील चॅटिंग करून अश्‍लील व्हिडिओ पाठविणात आल्‍याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत आरोपीला आळंदी येथून औरंगाबाद सायबर सेल आणि एमआयडीसी सिडको पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली. तांत्रिक तपास करून मोबाइल क्रमांकावरून मूळ मालकाचा शोध घेतल्‍यानंतर पोलिसांनी मोबाइल वापरणार्‍याच्या मुसक्या आवळल्या.

अंगद पांडूरंग गजमल (29, रा. सावतामाळी भवन, जगन्नाथ पार्क, आळंदी, वडगाव रोड) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तो एका कंपनीत सुपरवायझर असून त्याला 22 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्याच्याविरुद्ध मोबाइल चोरीचाही गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

वकिल असलेल्‍या २८ वर्षीय महिलेच्या मोबाइलवर आरोपी अश्‍लील व्हिडिओ पाठवून त्यांत्रा त्रास देत होता. तो वारंवर व्हाट्सअ‍ॅपवरून कॉलिंगही करायचा. 30 डिसेंबर ते 11 जानेवारीदरम्यान त्याचा हा उद्योग सुरू होता. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून एमआयडीसी सिडको ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, उपनिरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह सायबर सेलचे सहायक निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक हेमंत तोडकर, हवालदार धुडकू खरे, कॉन्स्टेबल हरीकिरण वाघ, नितीन देशमुख, विवेक औटी, रेवनाथ गवळे, प्रदीप कुटे, अतुल तुपे, ज्योती भोरे, शिल्पा तेलुरे यांच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे मोबाइल मालकाचा शोध घेतला. तो आळंदी येथे असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिस त्याच्या घरी पोहोचले. परंतु, त्याने दोन महिन्यापूर्वीच मोबाइल हरवल्याचे सांगितले. त्यानंतर या मोबाइलचा वापर करणार्‍याचा शोध पोलिसांनी सुरू केला. त्यानंतर अंगद गजमल पोलिसांच्या जाळ्यात अडकला.