Wed, Apr 24, 2019 15:32होमपेज › Aurangabad › ड्रोन उडेना, वज्र बिघडले; तर वरुणला बोलावलेच नाही

ड्रोन उडेना, वज्र बिघडले; तर वरुणला बोलावलेच नाही

Published On: May 19 2018 1:45PM | Last Updated: May 19 2018 1:45PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

संख्याबळ वाढविण्यापेक्षा आधुनिक उपकरणांचा वापर करून ‘स्मार्ट वर्क’  करण्याकडे सरकारी यंत्रणांचा कल आहे. पोलिसही त्याला अपवाद नाहीत.  सातत्याने आधुनिक अ‍ॅप्स, उपकरणे आणून औरंगाबादेत वरिष्ठ अधिकार्‍यांनी आधुनिकतेकडे पाऊल टाकले  आहे. त्यासाठी ते सतत  मेहनत घेत असताना ऐनवेळी नियोजन कोलमडल्यामुळे दंगल नियंत्रणात  आणण्यासाठी एकाही आधुनिक उपकरणाचा वापर झाला नसल्याचे समोर  आले.

अंधारामुळे ड्रोनचा, तर नादुरुस्त असल्याने वज्र वाहनाचा वापर यावेळी  झाला नाही. तसेच, वरुण वाहनाला तर पाचारणही न केल्याचे समोर  आले आहे. शुक्रवारी मध्यरात्री गांधीनगर, मोतीकारंजा, राजाबाजार, शहागंज, नवाबपुरा, जिन्सी भागात दंगल उसळली होती. यात जाळपोळ  आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली. जवळपास 75 दुकाने, घरे आणि  64 वाहने जाळण्यात आली. साडेदहा कोटींचे नुकसान झाले असून जाळपोळीत एका वृद्धाचा होरपळून मृत्यू झाला. पोलिसांच्या फायरिंगमध्ये  एका तरुणाला जीव गमवावा लागला.

जुन्या औरंगाबादमध्ये तणाव निर्माण करणार्‍या या दंगलीला नियंत्रणात  आणण्यासाठी पोलिस कमी पडल्याचे अनेक पुरावे आता समोर येऊ लागले  आहेत. एकीकडे जिन्सीच्या ठाणेदाराने योग्य प्रतिसाद दिला नसल्याचे सांगितले जाते. तर दुसरीकडे पूर्वीचा वाद सिटी चौक पोलिसांनी योग्य  पद्धतीने न हाताळल्यामुळेच दंगल घडली, अशी चर्चा सुरू आहे. त्यातच गाजावाजा करून खरेदी केलेले कोट्यवधींचे ड्रोन कॅमेरे यावेळी वापरण्यात  आले नाहीत. अंधारात ते वापरणे शक्य नव्हते, असे सांगितले जाते. शिवाय दंगल नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावी ठरणारे वज्र वाहन नादुरुस्त असल्याने त्याचाही वापर झाला नाही.

जमावावर रंगाचे पाणी मारून त्यांना पिटाळून लावणारे आणि ओळख  पटविण्यासाठी फायदेशीर ठरणार्‍या वरुण वाहनाची तर यावेळी आठवणही झाली नाही, असे समोर आले आहे. ते का बोलावण्यात आले  नाही?, ही नेमकी कोणाची चूक या बाबींचा आता तपास होणे  अपेक्षित आहे. त्यामुळे पोलिस नेमके कुठे कमी पडले याचाही तपास दंगलीच्या निमित्ताने करणे गरजेचे झाले आहे.

का होते प्रत्येक वेळी ही चूक?
दंगल नियंत्रणात आणण्यात प्रत्येक वेळी औरंगाबाद पोलिस का कमी पडताहेत, याचे संशोधन करण्याची वेळ आली आहे. पाच महिन्यांत चार दंगलींना सामोरे गेलेल्या पोलिसांकडून पुन्हा-पुन्हा त्याच चुका होत असल्याचे निदर्शनास आले आहे. पुन्हा जमावावर तुटून पडण्यात काहीही अर्थ नसताना आधीपासूनच योग्य नियोजन का होत नाही? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.