Mon, Jun 24, 2019 17:44होमपेज › Aurangabad › औरंगाबाद हिंसाचार : दोघांचा मृत्यू; जमावबंदीनंतर तणावपूर्ण शांतता

औरंगाबाद हिंसाचार : दोघांचा मृत्यू; जमावबंदीनंतर तणावपूर्ण शांतता

Published On: May 12 2018 9:34AM | Last Updated: May 12 2018 2:09PMऔरंगाबाद: पुढारी ऑनलाईन

मागील दोन महिन्यांपासून शांत असलेल्या औरंगाबाद शहरात अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून दोन गट तुफान हणामारी झाली आणि हिंसाचारास सुरुवात झाली. शहरातील मोतीकारंजा परिसरात दोन गटात तलवारी,चाकूसह शुक्रवारी रात्री भिडले. जमावाने शहागंजमध्ये केलेल्या जाळपोळीत एकाचा तर पोलिसांच्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. दगडफेकीत अनेक नागरिकांसह पोलिस कर्मचारी आणि अधिकारी देखील जखमी झाले आहेत. मध्यरात्री झालेल्या दगडफेकीत  सहाय्यक पोलिस आयुक्त गोवर्धन कोळेकर हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर एका स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु असून ते आयसीयूमध्ये आहेत. पोलिस प्रशासनाने शहरात संचारबंदी लागू केली आहे. तसेच जिल्हाप्रशासनाने शहरात इंटरनेट सेवा बंद केली आहे.

वाचा: हिंसाचारात जमावाने दुकाने पेटवले, दिव्यांग व्यक्तीचा होरपळून मृत्यू

नेमके काय झाले...

औरंगाबाद महापालिकेकडून अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. गुरुवारपासून सुरु झालेल्या या मोहिमेत पहिल्या दिवशी एका धार्मिक स्थळाचे अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यात आले. त्यानंतर एका गटाने दुसऱ्या एका धार्मिक स्थळाचे नळ कनेक्शन तोडण्याची मागणी केली. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्या धार्मिक स्थळाचे नळ कनेक्शन तोडले. त्यावरून शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास एका गटाने मोतीकारंजा रोडवरील दुकानांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर जमावाने तोडफोड, जाळपोळ देखील केली. यावर प्रतिक्रिया म्हणून दुसरा गट देखील रस्त्यावर उतरला आणि त्याने तोडफोड व जाळपोळ सुरु केली. गांधीनगर, शहाजंग, निझामुद्दीन चौक, नवाबपूरा, चेलीपूरा परिसरात पोलिसांनी रात्री प्लॅस्टिग बुलेटचा वापर केल्याचे डीसीपी विनायक ढाकणे यांनी सांगितले. शहरातील गांधी भवनजवळच्या एका इमारतीला जमावाने आग लावली. या इमारतीत असलेल्या सिलिंडरचा देखील स्फोट झाला. आतापर्यंत 40 ते 50 दुकाने, 60 ते 70 दुकाची पेटवण्यात आल्याचे डीसीपींनी सांगितले. 

वाचा: औरंगाबाद: शांत शहर पुन्हा पेटले

त्यानंतर शहरातील सर्व बंदोबस्त मोतीकारंजा येथे तैनात करण्यात आला. अभिनय टॉकीज ते मोतीकारंजा रस्त्यावर जमाव तीव्र होता. दगड, काठ्या, तलवारी घेऊन जमाव समोरच्या गटावर हल्ला करीत होता. अश्रुधुराचे नळकांडे फोडले, हवेत गोळीबार केला, तरीही जमाव पांगला नाही.

पोलिस अधिकारी देखील जखमी

मोतीकारंजा परिसरात परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस दल दाखल झाले. पण जमावाने पोलिसांवर देखील दगडफेक केली. यात सहाय्यक पोलिस आयुक्त गोवर्धन कोळेकर, कांती पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक श्रीपाद परोपकारी यांच्यासह 10 जण जखमी झाले आहेत. 

वाचा : औरंगाबाद : ‘तुम्ही आमचे नळ कनेक्शन तोडले, त्यांचेही तोडा’(फोटो) 

घरांमध्ये घुसून तलवारीने हल्ला

मनपाने शहरात अवैध नळ कनेक्शन कट करण्याची मोहीम उघडली असून गुरुवारी मोतीकारंजा भागात काही नळ कट करण्यात आले होते. ही कारवाई गांधीनगरमधील लोकांच्या सांगण्यावरून झाल्याची चर्चा करून मोतीकारंजा भागातील नागरिकांनी शुक्रवारी आणखी नळ कट करण्याची मागणी केली. त्यावरून दोन्ही भागातील गट समोरासमोर आले. गांधीनगरच्या गटाने कुलर विक्रेत्यांची दुकाने फोडत जाळपोळ केली, तर मोतीकारंजा भागातील गटाने गांधीनगरमधील घरांमध्ये घुसून तलवारीने हल्ला केला. तेथून पुढे हा वाद पेटला.

मृतदेह स्वीकारण्यास नकार

शुक्रवारी रात्री झालेल्या हिंसाचाराच्या घटनेत पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अब्दुल हरीश अब्दुल हारुन कादरी जखमी झाला होता. रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी जोपर्यंत शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे आणि पक्षाच्या शहर अध्यक्षांच्यावर 302 कलमानुसार गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत मृतदेह घेणार नसल्याचे कादरीच्या कुटुंबियांनी सांगितले.

सर्व इंटरनेट सेवा 48 तासांसाठी बंद

शहरात अफवांचे पीक पसरू लागल्याने इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली.