होमपेज › Aurangabad › पिस्तूल, काडतुसे सापडेनात; पोलिस कॉन्स्टेबल बडतर्फ

पिस्तूल, काडतुसे सापडेनात; पोलिस कॉन्स्टेबल बडतर्फ

Published On: Jan 19 2018 11:57AM | Last Updated: Jan 19 2018 11:57AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

पिस्तूल आणि दहा काडतुसे गहाळ झाल्याच्या प्रकरणात पोलिस कॉन्स्टेबल अमित शिवानंद स्वामी (वय 27) याला पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी बडतर्फ केले. बारा दिवसांपूर्वी शनिवारी (6 जानेवारी) रात्री आकाशवाणी चौकात झालेल्या रिक्षा अपघातानंतर स्वामी याच्याकडील पिस्तूल आणि काडतुसे गहाळ झाल्याचे समोर आले होते. या पिस्तुलाचा अद्यापही शोध लागलेला नाही, हे विशेष.

अमित स्वामी याची मुख्यालयात नियुक्ती असून तो हायकोर्ट सुरक्षा विभागात कार्यरत आहे. नवीन खोलीत सामान घेऊन येताना शनिवारी (6 जानेवारी) रात्री आकाशवाणी चौकात रिक्षाचा (एमएच 20, बीटी 7380) अपघात झाला. यात अमित स्वामी जखमी झाला. अपघाताची माहिती मिळाल्यावर जवाहरनगर पोलिसांनी स्वामीला घाटीत दाखल केले. दरम्यान, स्वामी शुद्धीवर आल्यानंतर त्याचे पिस्तूल गहाळ झाल्याचा प्रकार समोर आला. विशेष म्हणजे, अपघात झाला तेव्हा स्वामीसह त्याच्यासोबत असणारे दोघेही नशेत होते, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, दोन दिवसांत पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी अमित स्वामी याला निलंबित केले होते. आता बारा दिवस उलटले तरी पिस्तूल सापडले नाही. स्वामीकडूनही काहीच सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे पोलिस आयुक्त यादव यांनी स्वामीला खात्यातून बडतर्फ केले.

स्वामीची चौकशी करणार

पिस्तूलचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी बडतर्फ करण्यात आलेला कॉन्स्टेबल अमित स्वामी याची चौकशी करणार आहेत. तसेच, त्याच्या अटकेचीही पोलिसांनी तयारी सुरू केली आहे. पिस्तूल गहाळ झाले की चोरीला गेले? हा प्रश्‍न अद्याप कायम असून हे पिस्तूल हातात घेऊन काहींनी सेल्फी घेतलेले आहेत. ती छायाचित्रे पोलिसांना हाती लागली आहेत. हे सर्वजण रडारवर असल्याचेही पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले.