औरंगाबाद : प्रतिनिधी
गुन्हे कमी करण्यात पोलिसांची गस्त अतिशय महत्त्वाची असून जीपीएस प्रणालीमुळे रात्रगस्तीवरील पोलिस गल्ली-बोळांत प्रभावी गस्त घालत आहेत. परंतु, 12 गाड्यांचे जीपीएस बिघडल्याचे समोर आल्याने गस्त वार्यावरच सुरू असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, जीपीएस हा पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांचा पायलट प्रोजेक्ट आहे. नेमके त्यालाच पोलिस अधिकारी खोडा घालत असल्याचे यावरून स्पष्ट झाले. परंतु, यापुढे जीपीएस बंद आढळले तर कारवाई केली जाईल, असा सज्जड दम आयुक्तांनी भरला आहे.
सहायक पोलिस आयुक्त रामेश्वर थोरात यांनी नुकतीच फेब्रुवारीपर्यंतच्या गुन्ह्याची माहिती देताना गतवर्षीपेक्षा यंदा गुन्ह्यात प्रचंड घट झाल्याचा दावा केला. जीपीएस आणि सीसीटीव्हीमुळेच पोलिसांना गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविता आले, असेही त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले होते. आता याच जीपीएस प्रणालीला ग्रहण लागल्याचे समोर आले आहे. सर्व पोलिस ठाणे, नियंत्रण कक्ष, विशेष पथक, गुन्हे शाखा यांची वाहने रात्र गस्तीवर असतात.
या सर्व वाहनांना जीपीएस बसविण्यात आलेले असून त्यावरून वाहनांचे ठिकाण नियंत्रण कक्षात कळते. परंतु, 12 वाहनांचे जीपीएस बिघडल्याचा गंभीर प्रकार समोर आला. बॅटरी डिस्चार्ज होणे, वाहन बिघडणे, चालक नसणे आदी कारणांमुळे 12 जीपीएस यंत्र काम करीत नसल्याचा अहवाल पोलिस आयुक्तांकडे प्राप्त झाला. त्यावर त्यांनी तत्काळ सुधारणा करून घेण्याचे सांगत यापुढे चालक नाही, असे कारण सांगून कोणीही जीपीएस वाहन बंद ठेवू नये, असे आदेश दिले आहेत.
सीसीटीव्ही कट करणार्याविरुद्ध गुन्हे ःसेफसिटी प्रकल्पाचे 48 सीसीटीव्ही शहरात कार्यरत आहेत. मनपाचे ठेकेदार काम करताना दुर्लक्ष करून सेफसिटीचे केबल कट करतात. त्यामुळे अनेकदा कॅमेरे बंद पडतात. याचा परिणाम पोलिसांच्या कामावर होत आहे. यापुढे सीसीटीव्हीचे केबल कट करणार्यांविरुद्ध थेट गुन्हे नोंदवून दोषींना अटक केली जाईल, असेही पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी सांगितले.
मिटमिट्याचा प्राथमिक अहवाल सादर
7 मार्च रोजी दुपारी मिटमिट्यात कचरा प्रश्नावरून नागरिकांनी तुफान दगडफेक केली. यानंतर पोलिसांनी गावकर्यांना मारहाण करीत घरांवर दगड फेकले होते. विधानसभेपर्यंत गाजलेल्या या प्रकरणात पोलिस आयुक्तांनी मिटमिट्यात सात दिवस भेटही दिली नाही. परंतु, 13 मार्च रोजी रात्री त्यांनी मिटमिट्यात जाऊन बैठक घेत नागरिकांशी संवाद साधला.