Thu, Jul 18, 2019 02:29होमपेज › Aurangabad › मराठवाड्यात १० हजार एकरांवर तुती लागवड 

मराठवाड्यात १० हजार एकरांवर तुती लागवड 

Published On: Mar 06 2018 1:52AM | Last Updated: Mar 06 2018 1:48AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

मराठवाड्यात तुती लागवडीसाठी शेतकर्‍यांना प्रोत्साहित केले जात आहे. तुती लागवडीच्या मोहिमेत सहभागी करून घेतले जात आहे. फेब्रुवारीअखेरपर्यंत मराठवाड्यात दहा हजारांपेक्षा जास्त एकरांवर तुतीची लागवड करण्यात आली आहे. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी तुती लागवडीसाठी सर्वाधिक नोंदणी केली आहे. 

राज्यात सर्वाधिक तुती लागवडीमध्ये मराठवाड्याचा समावेश आहे. केवळ लागवडच नव्हे तर उत्पादनातही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. शासनानेही तुती लागवडीसाठी योजना लागू केली असून, विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. शासनाने रेशीम विस्तार व विकास कार्यक्रमांतर्गत 2018-19 या वर्षासाठी उपक्रम हाती घेतला होता. या अंतर्गत मराठवाड्याला 3 हजार 700 एकरांवर नवीन तुती लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे.

शेतकर्‍यांची नावनोंदणी करून, त्यांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी 1 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर या कालावधीत महा-रेशीम अभियान राबविण्यात आले. या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, फेब्रुवारीअखेरपर्यंत 10 हजार 57 एकरांवर मराठवाड्यातील शेतकर्‍यांनी लागवड केली आहे. राज्यभराच्या तुलनेत नवीन तुती लागवडीसाठी सर्वाधिक 70 टक्के नोंदणी मराठवाड्यातून झालेली आहे. औरंगाबाद जिल्ह्यासाठी 500 एकरांवर लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे, त्या तुलनेत 2,729 एकरांवर लागवडीची नोंदणी झाली आहे.