होमपेज › Aurangabad › मोर्चाच्या भीतीने पाइपलाइनची दुरुस्ती

मोर्चाच्या भीतीने पाइपलाइनची दुरुस्ती

Published On: Feb 15 2018 1:55AM | Last Updated: Feb 15 2018 1:33AM
औरंगाबाद : प्रतिनिधी

दीड महिन्यापासून मूळ सातारा गावाला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन नादुरुस्त आहे. यासंदर्भात नागरिकांनी मनपाच्या पाणीपुरवठा विभागाला अनेक वेळा निवेदने दिली, परंतु याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. अखेर संतप्त नागरिकांनी गुरुवारी मनपावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. मात्र बुधवारी (दि. 14) मनपा प्रशासनाने मोर्चाची धास्ती घेतल्याचे दिसले. सकाळीच गावातील जुनी पाइपलाइन दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ झाला. 

सातारा-देवळाई परिसर म्हटले अनेक समस्यांचे माहेरघर आहे. रस्ता, ड्रेनेजलाइन, पाणी टंचाई, लाईट या समस्या कायमच्याच झाल्या आहेत. विशेष बाब म्हणजे मूळ सातारा गावाला ग्रामपंचायत काळात बांधण्यात आलेल्या पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. 

मात्र ही पाइपलाइन जीर्ण झाली आहे. जागोजागी ती फुटून लाखो लिटर पाणी वाया जात असे. त्यामुळे दीड महिन्यापासून ही पाइपलाइनच पूर्णपणे बंद करण्यात आली. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. 

परिणामी, गावातील नागरिकांनी अनेक वेळेस प्रशासनाकडे पाइपलाइन दुरुस्तीची मागणी केली. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले. अखेर संतप्त नागरिकांनी प्रशासनाविरोधात भूमिका घेतली. याचीच भीती बाळगत मनपा प्रशासन खडबडून जागे झाले. बुधवारी अचानकपणे सकाळी नऊ वाजता पाइपलाइन दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली.