Mon, Mar 25, 2019 09:09होमपेज › Aurangabad › बॅनर फाडल्यावरून शहरात दगडफेक

बॅनर फाडल्यावरून शहरात दगडफेक

Published On: Feb 23 2018 9:38AM | Last Updated: Feb 23 2018 9:38AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

गारखेड्यातील विजयनगर चौकात शिवजयंतीनिमित्त लावलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे बॅनर फाडल्यावरून गुरुवारी (दि. 22) संध्याकाळी 7 वाजता शहरात तणाव निर्माण झाला. या घटनेनंतर मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी  पुंडलिकनगर ठाण्यात गर्दी करून कारवाईची मागणी केली.

दरम्यान, तरुणांच्या गटाने दुचाकीवरून शहरातील विविध बाजारपेठांमध्ये घुसून घोषणाबाजी केली. तसेच, दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. रात्री 9 ते 10 वाजेच्या सुमारास ही परिस्थिती आणखी चिघळली होती. टी.व्ही. सेंटर भागात जमावाने घोषणाबाजी करून रस्ता अडवला. कपिल जोगदंड (न्यायनगर, मुकुंदवाडी), कुणाल वैष्णव आणि किशोर ठोंबरे (राजनगर, रेल्वे पटरीच्या पलीकडे) अशी गुन्हा नोंद झालेल्या तरुणांची नावे आहेत. त्यांना अटक करण्यात आली आहे. ते एका तडीपार गुंडाच्या टोळीतील असून, दोन दिवसांपूर्वीच
कपिल आणि किशोर यांनी एका तरुणाला मारहाण करून दहशत निर्माण केल्याचागुन्हा मुकुंदवाडी ठाण्यात नोंद आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 19 फेब्रुवारी रोजी शहरात छत्रपतींची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त विविध संघटना, पदाधिकार्‍यांनी शहरात बॅनर्स लावले होते. गारखेड्यातील विजयनगर चौकात असलेले बॅनर फाडून काही समाजकंटकांनी गोंधळ घातला. हा प्रकार संघटनेच्या पदाधिकार्‍यांना समजताच त्यांनी पुंडलिकनगर ठाण्यात धाव घेतली. बॅनर फाडणार्‍याविरुद्ध कारवाईची मागणी करीत अंदाजे 500 लोकांचा जमाव ठाण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली.
दरम्यान, छत्रपतींचे बॅनर फाडल्याची वार्ता वार्‍यासारखी शहरात पसरली. सोशल मीडियावरून सर्वत्र चर्चा सुरू होताच तरुणांच्या एका गटाने दुचाकीवरून पुंडलिकनगर रोड, सूतगिरणी चौक, त्रिमूर्ती चौक, गजानन महाराज मंदिर, कॅनॉट, मुकुंदवाडी, जयभवानी नगर, टी.व्ही. सेंटर, जालना रोड, कामगार चौक, हर्सूल परिसरासह शहरातील विविध भागांत फिरून दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. टी.व्ही. सेंटरवर तणाव शहरात तणाव निर्माण झाल्याचे समजताच शहरात मोठा बंदोबस्त लावण्यात आला. दरम्यान, रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास दोन हजारांचा जमाव टी.व्ही. सेंटर भागात एकत्र आला. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. परिस्थिती चिघळण्याची शक्यता वाढल्याने बंदोबस्त तैनात केला होता, परंतु जमाव ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. माजी खा. प्रदीप जैस्वाल यांनी येथे भेट देऊन शांततेचे आवाहन केले. बस, पोलिसांच्या गाडीवर दगडफेक टी.व्ही. सेंटर चौकात जमलेल्या जमावाने एक बस, पोलिसांचे वाहन, तसेच इतर वाहनांवर दगडफेक केली. यात बस आणि पोलिसांच्या जीपचे नुकसान झाले. हडको कॉर्नर, एसबीओए शाळा परिसर, मयूर पार्क, हर्सूल टी पॉइंट भागात शेकडो लोकांचा जमाव जमला होता. सध्या परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणात आहे. शहरात राज्य राखीव पोलिस दलाचे जवान तैनात असून शहर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. जमावाने अफवांवर विश्‍वास ठेवू नये. सोशल मीडियावर अफवा पसरवू नयेत असे उपायुक्‍त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी आवाहन केले आहे.

परीक्षा आहे, शांतता बाळगा : मराठा क्रांती मोर्चा
घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे. त्याचा निषेध झालाच पाहिजे. मात्र, या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे शिवभक्तांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये. सध्या बारावीची परीक्षा सुरू आहे. विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास होईल, असे कृत्य करू नये. शांतता बाळगावी, असे अवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेनंतर रात्री क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील, राजेंद्र जंजाळ, अभिजित देशमुख, बाळासाहेब थोरात, बाळासाहेब औताडे, विजय दांडगे, रमेश केरे यांनी शहरातील विविध भागांत फिरून नागरिकांना शांततेचे आवाहन केले. आरोपींना कठोर शासन करावे, अशी मागणीही मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केली आहे.