Sun, May 26, 2019 00:43होमपेज › Aurangabad › रात्री पेट्रोलपंप बंद 

रात्री पेट्रोलपंप बंद 

Published On: Feb 02 2018 1:33AM | Last Updated: Feb 02 2018 1:02AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

पेट्रोलमध्ये पाणी मिसळले जात असल्याच्या तक्रारींमुळे पंपचालक आणि वाहनधारकांमध्ये वाद होत असून, हा प्रश्‍न सोडवण्यासाठी कंपन्यांनी इथेनॉलबाबत जनजागृती करावी, अशी मागणी वारंवार कंपन्यांकडे केली, मात्र कंपन्यांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने औरंगाबाद पेट्रोल-डीलर्स असोसिएशनने गुरुवारपासून (दि.1) रात्री 7 ते सकाळी 7 यावेळेत पंप बंद ठेवण्याच्या निर्णयांची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे आता रात्री शहरातील पंपांवर पेट्रोल मिळणार नाही.

पेट्रोलमध्ये कंपन्यांकडून 10 टक्के इथेनॉल मिक्स करून दिले जाते. या इथेनॉलचा पाण्याशी संपर्क येताच त्यांचे रूपांतर पाण्यात होते. पाणीमिश्रित पेट्रोलमुळे वाहने रस्त्यावरच बंद पडतात, लवकर स्टार्ट होत नाहीत, अशा तक्रारी वाढल्या आहेत. पेट्रोल टाकीची तपासणी केल्यास त्यात पाणीमिश्रित पेट्रोल निघत आहे. त्यामुळे वाहनधारकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याने ते पेट्रोलपंपचालकांना जाब विचारत आहेत. अशावेळी वादविवाद होऊन पंपावर गोंधळ होत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 

या पार्श्‍वभूमीवर कंपनीच्या विक्री अधिकार्‍यांनी इथेनॉलबाबत जनजागृती करावी, अशी मागणी पंपचालकांनी अनेकदा कंपन्यांकडे केली. जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनाही याबाबत कार्यवाही करण्याची मागणी केली. त्यानंतरही कंपन्यांकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. कंपनीच्या या धोरणाविरोधात औरंगाबाद पेट्रोल डीलर्स असोसिएशनने रात्री 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत पेट्रोल-डिझेल विक्री बंद करण्याचा इशारा काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन दिला होता. त्यानंतरही कंपन्यांकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. अखेर गुरुवारपासून असोसिएशनने शहरातील पंप दिवसाच (सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत)  सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी सायंकाळी सातनंतर पंप बंद करण्यात आले. या निर्णयाबाबत नागरिकांना माहिती नसल्याने अनेक वाहनधारकांना पंपावरून पेट्रोल न भरताच माघारी फिरावे लागले.