Wed, Apr 24, 2019 11:57होमपेज › Aurangabad › मराठा आरक्षण : २४ दिवसांपासून अन्नत्याग; जिवंत समाधीचा निर्धार

मराठा आरक्षण : २४ दिवसांपासून अन्नत्याग; जिवंत समाधीचा निर्धार

Published On: Aug 12 2018 8:15AM | Last Updated: Aug 12 2018 8:15AMऔरंगाबाद ः प्रतिनिधी

मराठा आरक्षणासाठी क्रांती चौक येथे उपोषणास बसलेल्या शिवभक्‍त पांडुरंग सवने पाटील यांनी स्वातंत्र्यदिनी रात्री बारा वाजता शिवरायांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी जिवंत समाधी घेणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे. उपोषणास २४ दिवस झाले तरी प्रशासन दखल घ्यायला तयार नाही, तसेच ३१ समाजबांधवांनी आत्महत्या केल्यानंतरही शासन सकारात्मक पाऊल उचलण्यास तयार नसल्याने उद्विग्‍न होऊन या निर्णयावर आल्याचे सवने पाटील यांनी सांगितले.

मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी शिवध्वज हाती घेऊन गेल्या २४ दिवसांपासून क्रांती चौकात पांडुरंग सवने पाटील हे उपोषण करत आहेत. त्यांची प्रकृती आता खालावत आहे, आवाज खोल गेला, चेहराही उतरला. चोवीस दिवसांत त्यांनी केवळ चार वेळा जेवण केले, तेही डॉक्टरांच्या आग्रहामुळे. सध्या ते केवळ नारळ पाणी, एनर्जी ड्रिंक आणि सलाईनवर जिवंत आहेत. अशा परिस्थितीतही प्रशासन व शासन आपली दखल घेत नसल्याने ते आणखीच खचले आहेत. शासनही समाज बांधवांच्या आत्महत्यांनंतरही  सकारात्मक पाऊल उचलण्यास तयार नाही. त्यामुळे सवने पाटील यांनी जिवंत समाधीचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. सवने पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात, मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी २४ दिवसांपासून क्रांती चौकात उपोषण करत आहे. काकासाहेब शिंदे यांच्यानंतर समाजातील ३१ तरुणांचे बळी गेले आहेत. तरीही प्रशासनाला कुठल्याही प्रकारची जाग आली नाही. आरक्षणाबाबतही कुठले आदेश काढले नाहीत. राजकीय लोकांनी केवळ आपली पोळी भाजण्याच्या हेतूने या ठिकाणी येऊन वाद घातले. आमचा ठिय्या पांगवण्याचा प्रयत्न केला. आम्ही या ठिकाणावरून उठणार नाही यावर ठाम आहे. शांततेच्या मार्गाने लढा दिला आहे. म्हणूनच १५ ऑगस्टला रात्री बारा वाजता समाधी घेणार आहे. तसेच मराठा क्रांती मोर्चातर्फे ठिय्या आंदोलन क्रांती चौक येथे सुरूच राहील, असेही कळविले आहे. 

मराठा आरक्षणासाठी उपोषण करत असल्याचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना दिले होते, पण अद्याप जिल्हा प्रशासन किंवा शासन कोणीच दखल धेतलेली नाही. 24 दिवसांत केवळ चार वेळेसच जेवण केले असून नारळ पाणी, एनर्जी ड्रिंक आणि सलाईनवर आहे. मागण्यांबाबत शासन सकारात्मक पाऊल उचलण्यास तयार नसल्याने जिवंत समाधीचा निर्णय घेतला आहे, असे उपोषणकर्ते पांडुरंग पाटील यांनी सांगितले.फ