Tue, Mar 19, 2019 03:32होमपेज › Aurangabad › ‘शंभर रुपये भरुन रस्त्यावर गाडी पार्क करा’

‘शंभर रुपये भरुन रस्त्यावर गाडी पार्क करा’

Published On: Jan 21 2018 10:36AM | Last Updated: Jan 21 2018 10:35AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

मनपाकडे महिन्याला शंभर रुपये भरा, अन् रस्त्यावर कुठेही गाडी पार्क करा, असे आगळे वेगळे पत्रच मनपाच्या स्थायी समितीच्या सभापतींनी मनपा आयुक्‍तांना शनिवारी दिले. प्रशासनाला योग्य वाटल्यास, तसा प्रस्ताव मंजुरीसाठी सभेपुढे मांडला जाणार आहे.

शहरात पार्किंगची मोठी समस्या निर्माण झालेली आहे, त्यात चारचाकी वाहने घेऊन बाजारपेठेत येणार्‍यांना कार कुठे पार्क करावी, असा प्रश्‍न पडतो. त्यामुळे अनेकजण रस्त्यावरच कार पार्क करतात. मनपाच्या मालकीच्या मोकळ्या जागांचाही वापर पार्किंगसाठी केला जातो. शहरात चारचाकी वाहनधारकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे बाजारपेठेत चारचाकी वाहने रस्त्यालगतच उभी केल्याने वाहतूक कोंडी होते. पार्किंगसाठी रस्त्याचा वापर करणार्‍यांकडून किमान पार्किंग शुल्क वसूल करण्याचा निर्णय मनपा प्रशासन घेण्याची शक्यता आहे. रस्त्यावर चारचाकी उभी करणार्‍या खासगी, व्यावसायिक वाहनधारकांकडून किमान 100 रुपये शुल्क घेतल्यास मनपाचे उत्पन्न वाढेल. शहरात किमान तीन लाखांच्यावर चारचाकी वाहनधारक आहेत. त्यातील अर्ध्या वाहनधारकांनीही प्रतिमहिना 100 रुपये शुल्क भरल्यास मनपाच्या तिजोरीत कोटींंचा महसूल जमा होईल.
शुल्क वसुलीचे काम खासगी ठेकेदाराला देता येईल. तसेच रस्त्यावर आणि मनपाच्या मालकीच्या खुल्या जागांवर चारचाकी वाहने पार्किंग करणार्‍यांना असे शुल्क आकारावे, असे पत्रच स्थायी समिती सभापतींनी मनपा आयुक्‍तांना दिले आहे. हे नाममात्र शुल्क भरून महिनाभरासाठी रस्त्यावर पार्किंगची सुविधा घेणार्‍या वाहनधारकांना पोलिसांकडून नो पार्किंगच्या कारवाईतून सूट मिळेल का?, हा प्रश्‍न मात्र अनुत्तरित ठेवला आहे.

पार्किंगसाठी रस्त्यांचा वापर करणार्‍या शहरातील खासगी, व्यावसायिक वाहनधारकांकडून दरमहा किमान शंभर रुपये शुल्क वसूल करावे, असे पत्र मनपा आयुक्‍तांना दिले आहे. पुणे, मुंबईत अशा प्रकारे शुल्क वसूल केले जाते. नाममात्र पार्किंग शुल्क देण्यास नागरिकांकडून विरोध होणार नाही. हा धोरणात्मक निर्णय असल्याने प्रशासनाला योग्य वाटल्यास त्याचा अभ्यास करून हा प्रस्ताव मंजुरीसाठी ते सर्वसाधारण सभेपुढे ठेवतील.

- गजानन बारवाल,स्थायी समिती सभापती.