Sun, Jul 21, 2019 17:03
    ब्रेकिंग    होमपेज › Aurangabad › पेपरफुटीच्या चौकशीला दहा दिवसानंतरही मुहूर्त नाही

पेपरफुटीच्या चौकशीला दहा दिवसानंतरही मुहूर्त नाही

Published On: Jan 12 2018 1:56AM | Last Updated: Jan 12 2018 1:56AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने वसंतराव नाईक महाविद्यालयातील पेपरफुटीच्या चौकशीसाठी घटनेच्या दिवशीच समिती स्थापन केली होती. तथापि, दहा दिवस उलटूनही या समितीला चौकशीसाठी अद्याप मुहूर्त मिळाला नाही.  

एमबीएच्या पेपरचा मोबाईलने फोटो काढून तो व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकण्यात आला होता. एक जानेवारी रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी तीन विद्यार्थ्यांना अटक केली होती. विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये मोबाईल घेऊन जाण्यास बंदी होती. तरीसुद्धा मोबाईल आत नेऊन पेपर फोडण्यात आला. या ‘स्मार्ट’ कॉपी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विद्यापीठाने तीन सदस्यांची समिती नेमली आहे.

या समितीत कुलसचिव डॉ. साधना पांडे, विशेष कार्य अधिकारी डॉ. वाल्मिक सरवदे आणि डॉ. संजय साळुंके यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे दहा दिवसानंतरही चौकशी समितीचे काम सुरू झाले नाही. या कामासाठी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांचे सहाय्य गरजेचे आहे. मुंबई विद्यापीठातील परीक्षा विभागाच्या कामासाठी नेटके अनेकदा मुंबईला असतात. परिणामी, चौकशीचे काम रखडले आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

येत्या 13 जानेवारीला परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांसोबत बैठक होणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष चौकशीचे काम सुरू होईल. आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचा प्रयत्न आहे.परीक्षेतील हायटेक गैरप्रकार रोखण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे.   - डॉ. साधना पांडे, कुलसचिव