Mon, Aug 19, 2019 04:55होमपेज › Aurangabad › सुखणा धरणातून शेतीला पाणी सोडण्यास विरोध

सुखणा धरणातून शेतीला पाणी सोडण्यास विरोध

Published On: Jan 30 2018 1:52AM | Last Updated: Jan 30 2018 1:52AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

सुखना धरणातून शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्याच्या विरोधात दाखल याचिकेत जिल्हाधिकार्‍यांना माहिती घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संभाजीराव शिंदे व न्या. एस. एम. गव्हाणे यांनी सोमवारी (दि. 29) दिले.  दरम्यान, सुखना धरणातून पाणी सोडण्यास पाणी व मत्स्य व्यावसायिक विरोध करत असल्याचा हस्तक्षेप अर्ज माजी जि. प. सदस्य उदयराज पवार यांनी दाखल केला आहे. याचिकेवर 1 फेब्रुवारी रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे. 

गारखेडा येथील सरपंच मनीषा शैलेश चौधरी यांनी खंडपीठात या संदर्भात जनहित याचिका दाखल केली आहे. ग्रामपंचायत गारखेडा 1 आणि 2 सह मंगरूळ, टाकळी माळी, चितेपिंपळगाव, हिवरा, लाडगाव, टोणगाव, जडगाव, चितेगाव, कुंभेफळ, आपतगाव येथील ग्रामपंचायतींनी सुखना धरणातील पाणी पिण्याकरिता राखीव ठेवण्याकरिता संबंधितांना वारंवार निवेदने दिली होती. मात्र विरोध असूनही औरंगाबाद पाटबंधारे मंडळाने 16 रोजी पाणी सोडले होते. यावर गारखेडच्या सरपंचानी अ‍ॅड. सिद्धेश्‍वर ठोंबरे यांच्यामार्फत खंडपीठात जनहित याचिका दाखल केली. याचिकेवर झालेल्या सुनावणीत खंडपीठाने प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले होते. 

जनहित याचिकेत माजी जि. प. सदस्य उदयराज पवार यांनी अ‍ॅड. शरद नातू यांच्यावतीने खंडपीठात हस्तक्षेप अर्ज दाखल केला. याचिकाकर्त्यांचे पती व सासरे यांचा धरणात मत्स्यबीज सोडण्याचा व्यवसाय आहे. पाटबंधारे विभागाने यापूर्वी पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर याचिकाकर्त्यांतर्फे त्यास विरोध करण्यात आला. या विरोधामुळेच पाटबंधारे विभागास पोलिस संरक्षण घ्यावे लागले. ऑक्टोबरमध्ये शेतकर्‍यांनी मागणी केली तेव्हा धरणात पन्नास टक्के साठा होता. शासनाने स्वत:हून वेळीच पाणी सोडण्याची गरज होती. 

डिसेंबरमध्ये पाणी सोडल्यानंतर कालव्यात क्राँकीट टाकण्यात आले. यासंबंधी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविल्याचे अर्जात म्हटले आहे. सुखना धरणात मोठ्या प्रमाणावर मत्स्यबीज सोडले असून, पाणी सोडल्यामुळे आर्थिक नुकसान होईल या वैयक्तिक हितासाठी संपूर्ण शेतकर्‍यांना वेठीस धरले जात असल्याचे हस्तक्षेप अर्जात म्हटले आहे.