Tue, Mar 19, 2019 21:06होमपेज › Aurangabad › दलित वस्ती योजनेमध्ये शिवसेनेची आडकाठी

दलित वस्ती योजनेमध्ये शिवसेनेची आडकाठी

Published On: Apr 22 2018 1:11AM | Last Updated: Apr 22 2018 12:43AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागांतर्गत राबवण्यात येणार्‍या दलित वस्ती सुधार योजनेच्या कामात सत्ताधारी शिवसनेच्या काही सदस्यांनी आडकाठी घातली आहे. आमच्या विरोधानंतरही प्रस्तावांना मान्यता दिल्यास थेट न्यायालयात जाण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिल्याने 447 प्रस्ताव रखडल्याचे समाजकल्याण सभापतींनी सांगितले.

जि.प. समाजकल्याणला दलित वस्ती सुधार योजनेसाठी कधी नव्हे तब्बल तीस कोटींचा निधी उपलब्ध झाला. मात्र, या कामाला वर्षभरात मुहूर्तच लागला नाही. पदाधिकारी, सदस्यांचे ठिय्या आंदोलन, योजनांचे पुनर्गठन आरोप-प्रत्यारोपातच वर्ष सरले, मात्र योजना मार्गी लागल्याच नाहीत. गेल्या चार महिन्यांपासून विभागाला 447 प्रस्ताव प्राप्‍त झालेले आहेत. यातील काही प्रस्तावांत त्रुटी आहेत. विलंब झालेला असतानाही इतिहासात पहिल्यांदाच विषय समितीने त्रुटींच्या पूर्ततेनंतरच सर्व प्रस्ताव मान्य करण्याचा ठराव घेतला. यात शिवसेनेच्या सदस्यांनी हेकेखोर भमिका घेतल्याची आता चर्चा सुरू आहे. यासंबंधी त्यांनी अतिरिक्‍त सीईओ अशोक सिरसे यांना निवेदनही दिले असून प्रस्ताव मान्य केल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. त्यामुळे सर्वच प्रस्ताव प्रलंबित आहेत. विशेष म्हणजे अतिरिक्‍त सीईओ सिरसेही गेल्या काही दिवसांपासून सुटीवर आहेत. ते आल्यानंतरच योजनांबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

समाज, अपंग कल्याणचे कोट्यवधी तिजोरीतच

समाज कल्याण विभागांतर्गत राबवण्यात येणार्‍या अपंग आणि वैयक्‍तिक लाभाच्या योजनांना गेल्या दोन वर्षांपासून खीळ बसली आहे. गेल्या वर्षीचे चार कोटी आणि मावळत्या वर्षाचे साडेतीन कोटी असा एकूण साडेसात कोटींचा निधी तिजोरीत पडून आहे. 2016-17 आणि 2017-18 दोन्ही वर्षांतील लाभार्थी लाभापासून वंचित आहेत. उपकराचाच निधी असल्याने कोणी गांभीर्यानेही घेत नसल्याने लाभार्थी वंचित राहात आहे.

बीडीओंची मुजोरी; आता कारवाई

डॉ. सचिन मडावी यांच्या बदलीनंतर विभागाला पूर्णवेळ अधिकारी मिळालेला नाही. दीड महिन्यापूर्वी सिल्‍लोडच्या सहायक गटविकास अधिकारी ज्योती राठोड यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला. मात्र, मुजोर गटविकास अधिकारी सहकार्य करत नसल्याचे जि.प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांनी सांगितले. कामाचे गांभीर्य लक्षात न घेता वैयक्‍तिक हेवेदाव्यातून मुजोरी करणार्‍या बीडीओंची शनिवारी बैठक बोलवण्यात आली आहे. सुचनांचे पालन आणि विभागप्रमुखांचे आदेश न पाळल्यास कारवाई प्रस्तावित केली जाईल, असा इशारा डोणगावकर यांनी दिला.

Tags : Aurangabad , Dalit Vasti Yojna, Shiv Sena, Opposition,