Tue, Jul 23, 2019 06:19होमपेज › Aurangabad › लाच दिली तरच सिंचन विहिरींचा निधी

लाच दिली तरच सिंचन विहिरींचा निधी

Published On: Apr 22 2018 1:11AM | Last Updated: Apr 22 2018 12:50AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरीचे लाभ मिळालेल्या शेतकर्‍यांकडून लाच मिळाली तरच निधी दिला जातो, असा गंभीर आरोप बांधकाम सभापती विलास भुमरे आणि सदस्य किशोर बलांडे यांनी स्थायी समितीच्या सभेत केला. कामचुकार व निर्ढावलेल्या अधिकार्‍यांमुळे दुष्काळ असूनही बीडीओ अर्ज फेकून देतात, मजुरांना काम मिळत नाही. तीन वर्षांपासून योजनेला खीळ बसली. दोषींवर कारवाईची मागणी सदस्यांनी केली.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अ‍ॅड. देवयानी डोणगावकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि. 21) स्थायी समितीची बैठक झाली. यावेळी सीईओ पवनीत कौर, उपाध्यक्ष केशवराव तायडे, सभापती भुमरे, धनराज बेडवाल, कुसुम लोहकरे, मीना शेळके, सदस्य व अधिकार्‍यांची उपस्थिती होती. मजूर काम मागत असताना रोजगार हमी योजनेत कामेच दिली जात नसल्याचा आरोप सदस्य बलांडे यांनी केला. सध्या जिल्ह्यात चार हजार 110 आणि इतर यंत्रणांमध्ये एक हजार 570 कामे मंजूर आहेत, मात्र केवळ 671 इतकीच कामे सुरू असल्याचे ते म्हणाले. बीडीओ देखील सरपंचाकडून आलेल्या कामांच्या मागण्यांचे अर्ज धुडकावून लावत आहेत. अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी केली. प्रश्‍नाचे उत्तर देताना विभागप्रमुख कुलकर्णी यांची दमछाक झाली.

नऊ महिन्यांपासून कार्यारंभची प्रतीक्षा : नऊ महिन्यांपूर्वी कन्नड तालुक्यातील 381 विहिरींना प्रशासकीय मान्यता दिली. मात्र, अद्यापही कार्यारंभ आदेश मिळालेले नाही. अखेर शेतकर्‍यांनी पंचायत समितीसमोर आंदोलन सुरू केले. त्याकडे मुजोर अधिकार्‍यांनी ढुंकूनही पाहिले नाही. थेट मंत्र्यांशी बोलावे लागले, ही बाब दुर्दैवी आहे. कन्नडचे बीडीओ कार्यालयाऐवजी पेनड्राईव्हच्या साहाय्याने बाहेरच काम करतात, असा आरोप किशोर पवार यांनी केला.

सिंचन विहिरींचे 39 कोटी थकले : जिल्ह्यात शेतकर्‍यांना मंजूर झालेल्या तीन हजार 570 सिंचन विहिरींचे काम रखडले आहे. तसेच अनुदानाचे तब्बल 39 कोटी 4 लाख 45 हजार रुपये शासनाकडे थकल्याचे बलांडे म्हणाले. विभागप्रमुख कुलकर्णी यांनी मात्र अजून केवळ वीस कोटी आवश्यक असल्याचे सांगितले. मात्र, तरी अवघ्या तीन कोटींचे एफटीओ भरले आहेत. सिंचन विहिरींची कामे रखडल्याने शेतकरी चिंतेत आहेत. विहिरींमुळे शेतात पाणी उपलब्ध होईल.

नाश्त्याप्रमाणे कामेही लवकर व्हावी : सभेच्या प्रारंभ बलांडे बोलण्यास उभे राहिले आणि काही वेळेतच नाश्ता घेऊन कर्मचारी आला. महत्त्वाची चर्चा सुरू असल्याने त्यांनी नाश्ता परत केला. नाश्ता जसा तत्काळ दिला जातो, तसेच कामेही झटपट व्हायला हवी, असे म्हटले. त्यावर सीईओ कौर यांनी कामेही लवकर होतील, पण तुम्ही नाश्त्यात अडचण आणली तसे कामात आणत जाऊ नका, अशी टिप्पणी केली. कौर पहिल्यांदाच सीईओचा पदभार सांभाळत असून यापूर्वी स्थायी सभा अनुभवलेली नसल्याचे त्या म्हणाल्या. शनिवारी त्यांनी सभेच्या कामकाजाचे केवळ अवलोकन केले.

सरकारची केवळ जाहिरातच : सरकार केवळ मागेल त्याला काम, अशी रोजगार हमी योजनेची जाहिरात करत आहे. मात्र, प्रत्यक्षात मागणी करूनही मजुरांना काम मिळेना, असा टोला शिवसेनेचे सभापती भुमरे यांनी भाजपला लगावला. त्यावर तत्काळ भाजपचे सदस्य मधुकर वालतुरे यांनी शासनाची बाजू सावरली. योजना चांगलीच आहे, पण खाली अधिकारी-कर्मचारीच काम करत नसल्याचे ते  म्हणाले.

Tags : Aurangabad, Only if you give bribe Irrigation Wells Fund