Mon, Mar 25, 2019 17:29होमपेज › Aurangabad › रब्बी पिकांसाठी अवघ्या ५० शेतकर्‍यांनी भरला पीक विमा

रब्बी पिकांसाठी अवघ्या ५० शेतकर्‍यांनी भरला पीक विमा

Published On: Jan 02 2018 12:58AM | Last Updated: Jan 02 2018 12:15AM

बुकमार्क करा
सोयगाव : प्रतिनिधी

पंतप्रधान पीक विमा योजनेची रब्बी पिकांची पीक विमा भरण्याची मुदत 31 डिसेंबर रोजी  संपली असून, अद्यापही शासनाने रब्बीच्या पीक विम्यासाठी मुदतवाढ न दिल्याने शेतकरी संभ्रमात पडले आहेत. दरम्यान, तालुक्यात रब्बीच्या पीक विम्यातून ज्वारीची वगळणी करण्यात आली आहे. रब्बीच्या पीक विम्याची शेवटची माहिती  घेतली तेव्हा दोन कृषी मंडळांतून केवळ चाळीस शेतकर्‍यांनी शनिवार पर्यंत पीक विमा भरल्याची माहिती बँकेच्या सूत्राने दिली. 

रब्बी हंगाम 2016-17 या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या रब्बी हंगामात रब्बीसाठी गव्हाच्या पेर्‍यात मोठी वाढ झाली आहे, परंतु कमी पाणी आणि सततचे ढगाळ वातावरण यामुळे गव्हाच्या फुटव्यात घट आली आहे. तर मका, हरभरा या पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे खरिपापाठोपाठ रब्बी पिकेही धोक्यात आली असून पीक विम्याची मुदतही संपली आहे. त्यामुळे शेतकरी आणखीनच संकटात सापडले आहेत. रब्बीच्या पीक विम्यासाठी 15 ते 31 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती, परंतु बोंड अळींच्या संकटात अडकलेल्या व कर्जमाफीची रक्कम पदरात पाडून घेण्याच्या चक्रव्युहात अडकलेल्या रब्बी उत्पादक शेतकर्‍यांना रब्बी पिकांचा पीक विमा भरण्यासाठी हाती वेळच शिल्लक नव्हता.

त्यामुळे नैसर्गिक संकटांवर मात करण्यात शेतकर्‍यांची पीक विमा भरण्याची वेळ हातातून निघून गेली आहे. त्यातच काही भागात खरिपाच्या उत्पन्नात मोठी तूट आल्याने शेतकर्‍यांचे बेहाल झाले आहे तर आर्थिक चणचणमुळे शेतकर्‍यांना रब्बीचा पीक विमा भरता आलेला नसल्याने मुदतवाढ देण्याची मागणी रब्बी उत्पादक शेतकर्‍यांनी केली आहे.