Thu, Jun 27, 2019 03:35होमपेज › Aurangabad › कांदा ऽ ५०; थाळीतून होतोय गायब

कांदा ऽ ५०; थाळीतून होतोय गायब

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

मोठ्या प्रतीक्षेनंतर कांद्याचे दर वधारत असल्याने उत्पादक शेतकरी काहीसा सुखावला आहे. मात्र, शहरात कांद्याचे भाव वाढल्याने सर्वसामान्य नागरिक चिंतेत आहेत. शुक्रवारी बाजार समितीत 4 हजार 200 रुपये प्रतिक्‍विंटल, तर किरकोळ बाजारात 50 ते 55 रुपये प्रतिकिलो प्रमाणे कांद्याची विक्री करण्यात आली. विशेष म्हणजे कांदा वधारताच हॉटेल, खाद्यपदार्थांच्या गाड्या, खानावळीतून कांदा गायब होऊ लागला आहे.

गेल्या दीड महिन्यापासून कांद्याचे भाव वाढत आहेत. शुक्रवारी जाधववाडीतील बाजार समितीमध्ये अव्वल दर्जाचा कांदा 4200 रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे विक्री करण्यात आली. तर सर्वसाधारण विचार करता 2600 रुपये क्‍विंटल, अशी कांद्याची विक्री पार पडली. परिणामी किरकोळ बाजारातील कांद्याचे भाव पन्नास रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. परिणामी भाजी-पोळी केंद्र, खानावळी, तसेच हॉटेल आणि खाद्य पदार्थ्यांच्या हातगाड्यांवरूनही कांदा गायब होऊ लागला आहे. थाळीमध्ये दिल्या जाणार्‍या कोशिंबिरीमध्येही कांदा टाकला जात नाही. वडा, भजी, तसेच नॉनव्हेज पदार्थांच्या दुकानांत कांद्याऐवजी काकडी, कोबी दिली जात आहे.

महिनाभर भाव स्थिर

जुना कांदा चढ्या दराने विकला जात आहे. थोड्या-फार प्रमाणात नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे. तरीही अजून महिनाभर कांद्याचे भाव असेच किंवा पाच-दहा रुपयांनी महागण्याची शक्यता व्यापार्‍यांनी वर्तवली आहे. महिनाभरानंतर नवीन कांद्याची आवक सुरू झाल्यावर मात्र, कांद्याचे भाव कोसळू शकतात, असेही व्यापार्‍यांनी सांगितले.