Sun, Jul 21, 2019 02:20होमपेज › Aurangabad › खून करून ज्योती झाली सायरा

खून करून ज्योती झाली सायरा

Published On: May 29 2018 1:44AM | Last Updated: May 29 2018 12:36AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

न्यायनगरात छापा मारून गुन्हे शाखेने गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसांसह एका महिलेला सोमवारी (दि. 28) अटक केली. ही महिला खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचे समोर आले असून पहिल्या पतीला सोडून दुसर्‍यासोबत संसार थाटल्यावर ती नाव बदलून तीन वर्षांपासून शहरातच मुक्‍कामी असल्याचे तपासात उघड झाले.

ज्योती कडुबा अहिरे हे तिचे मूळ नाव असून ती सायरा शहजाद शेख नाव धारण करून न्यायनगरात राहत होती. पहिल्या पतीला सोडल्यानंतर शहजाद सोबत लग्‍न करून तिने हे नाव धारण केल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणी उपायुक्‍त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी सांगितले की, न्यायनगरातील सिकंदर शेख यांच्या घरात मोक्‍कांतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपी शहजाद शमीम शेख (रा. आजमगढ, मुंबई, औरंगाबाद) याची पत्नी राहत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली.

त्यावरून सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक योगेश धोंडे, हवालदार संतोष सोनवणे, सुभाष शेवाळे, सतीश हंबरडे, सुधाकर राठोड, विजयानंद गवळी, नानासाहेब फुंदे, सिद्धार्थ थोरात, आनंद वाहूळ, नितीन धुळे, काकासाहेब पंडित, रेखा चांदे, संजीवनी शिंदे, शेख सुलताना यांच्या पथकाने छापा मारला. घरातून ज्योती कडूबा अहिरे ऊर्फ सायरा शेख हिला ताब्यात घेतले. घर झडतीमध्ये गावठी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केले. हे पिस्टल ती अवैधपणे बाळगत असल्याचे स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी तिला अटक केली. दरम्यान, तिच्याविरुद्ध पुंडलिकनगर ठाण्यात शस्त्र अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल केला. महिलेच्या घरात 19 वर्षीय तरूणी आणि 8 वर्षीय मुलगा राहात होते. तरूणी त्या महिलेची मुलगी असल्याचे समोर आले असून 8 वर्षीय मुलाच्या आईचा शोध लागलेला नाही.

शहजाद शेख मोक्‍कातील आरोपी

ज्योती कडूबा अहिरे ऊर्फ सायरा शहजाद शेख हिचा मानलेला पती शहजाद शेख हा मोक्‍कातील आरोपी आहे. तो इम्रान मेहंदीच्या टोळीत कार्यरत होता. पहिली पत्नी सोडून गेल्यावर त्याने ज्योतीशी घरोबा केला. एका कपड्याच्या दुकानात त्यांची ओळक झाली होती. त्याच्याविरुद्ध छावणी, जवाहरनगर, सिटी चौक, उस्मानपुरा आदी ठाण्यांत चेनस्नॅचिंगचे पाच गुन्हे दाखल आहेत.  संघटित गुन्हेगारी समोर आल्याने त्याच्याविरुद्ध मोक्‍का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. सध्या शहजाद शेख हा हर्सूल कारागृहात आहे.  

2015 मध्ये आली औरंगाबादेत

आरोपी ज्योती अहिरे ऊर्फ सायरा शेख हिच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 138/08 वरून सिटी चौक ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. तिने 4 सप्टेंबर 2008 रोजी दुपारी चार ते साडेचार वाजेच्या सुमारास मोहसीन अंजू हिच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून तिचा खून केला होता. या प्रकरणात शहजाद शमीम शेख, झेबा शहजाद शेख आणि ज्योती अहिरे हे आरोपी असल्याचे समोर आले होते. तेव्हापासून ती फरार होती. सुरुवातीला हरियाणा, उत्तर प्रदेशात वास्तव्य केल्यानंतर तिने पहिल्या पतीला सोडून आरोपी शहजाद शमीम शेख याच्याशी लग्‍न केले. त्यानंतर ज्योती कडूबा अहिरेची सायरा शहजाद शेख झाली. दरम्यान, 2015 मध्ये ती पुन्हा औरंगाबादेत आली. चेतनानगरातील एका नर्सिंग होममध्ये ती कामाला होती. नाव आणि राहणीमान बदलल्यामुळे तिला ओळखण्यात अडचणी येत होत्या. मात्र, गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून गुन्हे शाखेने ही धडक कारवाई केली.