Thu, Jun 20, 2019 02:20होमपेज › Aurangabad › बोंडअळीच्या भरपाईसाठी हवे एक हजार कोटी 

बोंडअळीच्या भरपाईसाठी हवे एक हजार कोटी 

Published On: Jan 13 2018 1:11AM | Last Updated: Jan 13 2018 12:31AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

बोंडअळीमुळे कापसाच्या नुकसान भरपाईपोटी मराठवाड्यातील शेतकर्‍यांना मदत वाटपासाठी सुमारे एक हजार कोटी रुपये हवे आहेत. सध्या काही जिल्ह्यांतील पंचनाम्यांचा अहवाल आला आहे. काही जिल्ह्यांचा बाकी आहे. येत्या काही दिवसांत हा अहवाल येईल. त्यानंतर मराठवाड्याचा एकत्रित अहवाल शासनाला सादर करण्यात येईल, अशी माहिती विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी शुक्रवारी दिली.

खरीप हंगामात मराठवाड्यातील 47 लाख 70 हजार 200 हेक्टरवर पेरणी झाली असून, यापैकी 15 लाख 92 हजार 200 हेक्टरवर कापसाचे पीक घेण्यात आले होते. औरंगाबाद जिल्ह्यात 4,07,200 हेक्टरवर कापसाची लागवड झालेली आहे, तर जालन्यात 2,79,500, परभणीत 1,91,700, हिंगोलीत 54,600, बीड  3,61,700, नांदेड 2,69,700, लातूर 4,900 आणि उस्मानाबाद जिल्ह्यात 22,600 हेक्टरवर लागवड झालेली आहे.

कापसाची वेचणी करण्यापूर्वीच त्यावर बोंडअळीने हल्ला केला. यात मराठवाड्यातील सुमारे 70-80 टक्के कापूस हातचा गेला. झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे करण्याचे आदेश शासनाने 7 डिसेंबर 2016 रोजी दिलेले आहेत. जीपीएस आधारित प्रत्यक्ष नुकसानीचा फोटोसह पंचनामे करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र कमी असल्याने या दोन्ही जिल्ह्यांचा अहवाल सर्वांत आधी विभागीय आयुक्‍तालयाला मिळाला. त्यानंतर नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांनीही अहवाल सादर केला आहे. मात्र औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांत पंचनाम्यांची प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे.

यासंदर्भात डॉ. भापकर यांच्याकडे विचारणा केली असता, ते म्हणाले, बोंडअळीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. ज्या जिल्ह्यात कापसाच्या लागवडीचे क्षेत्र कमी होते त्यांचे पंचनामे पूर्ण होऊन अहवाल आला आहे, मात्र जास्त क्षेत्र असलेल्या जिल्ह्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही. हा अहवाल येत्या काही दिवसांत येईल.