Thu, Apr 25, 2019 06:06होमपेज › Aurangabad › स्कूलबसच्या धडकेत जि. प. कर्मचारी ठार

स्कूलबसच्या धडकेत जि. प. कर्मचारी ठार

Published On: Mar 06 2018 1:56AM | Last Updated: Mar 06 2018 1:54AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

भरधाव स्कूल बसने समोरून जाणार्‍या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात जि. प. कर्मचार्‍याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात क्रांती चौक पोलिस ठाण्याजवळ असलेल्या पोलिस वाहन मध्यवर्ती कार्यशाळेसमोर सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडला आहे. लहानू त्र्यंबक घुगे (53, रा. भगतसिंगनगर, हर्सूल) असे मृत कर्मचार्‍याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लहानू घुगे हे सातारा परिसरातील जिल्हा परिषद मल्टिपर्पज शाळेत लिपिक म्हणून कार्यरत होते. सोमवारी दुपारी जिल्हा परिषद कार्यालयात शाळेचे काम असल्याने ते दुचाकीवरून (एमएच 20 डीएन 3001) येत होते. क्रांती चौक पोलिस ठाण्याजवळील चौकातून ते जात असताना नाथव्हॅली शाळेच्या बस (एमएच 20 एए 2288) चालकाने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यामुळे त्यांच्या डोक्यातील हेल्मेट बाजूला फेकले जाऊन दुबे हे बसच्या मागच्या चाकाखाली आले. त्यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले.

वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी अंभोरे यांनी नातेवाइकांच्या मदतीने त्यांना घाटीत आणले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. लहानू घुगे यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा आहे. दोन्ही मुलींचे लग्न झालेले आहे. तर मुलगा हा सध्या स्पर्धापरीक्षेची तयारी करत असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. या प्रकरणी बसचालक पुंडलिक नरवाडे याच्याविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून बस ताब्यात घेण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक अनिल काचमांडे तपास करत आहेत.