Wed, Feb 20, 2019 06:55होमपेज › Aurangabad › ‘तो’ शांत झोपलेला असताना ओतली वाळू; गुदमरून मृत्यू 

‘तो’ शांत झोपलेला असताना ओतली वाळू; गुदमरून मृत्यू 

Published On: Apr 20 2018 10:47AM | Last Updated: Apr 20 2018 10:47AMऔरंगाबाद ः प्रतिनिधी

हडको कॉर्नर येथील राष्ट्रवादी भवनजवळ वाळूच्या ढिगार्‍यात आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात सिडको पोलिसांना यश आले आहे. ढिगार्‍यावर झोपलेल्या व्यक्‍तीच्या अंगावर टिप्परचालकाने वाळू  रिचविल्यामुळेच गुदमरून त्याचा मृत्यू झाल्याचे तपासात स्पष्ट झाले. साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही फुटेज आणि वैद्यकीय अहवालावरून हे समोर आले. या प्रकरणी 18 एप्रिल रोजी  चालकाविरुद्ध मृत्यूस  कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला असून टिप्पर जप्त करण्यात आले आहे. 

शेख सलमान शेख कचरू (टिप्पर चालक) असे आरोपीचे नाव असून दुसर्‍या दिवशीही त्याचा शोध पोलिसांना लागला नव्हता.  समाधान किसन म्हस्के (35, रा. सावरगाव, ता. जाफराबाद, ह.मु. नवनाथनगर, पाण्याच्या टाकीजवळ, एन-  11, हडको) असे मृताचे नाव आहे. तो चिकलठाणा एमआयडीसीतील पॅरोसन कंपनीत कामाला होता. काही दिवसांपूर्वीच त्याची नोकरी गेली होती. 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, समाधान म्हस्के हा 2 एप्रिल रोजी दुचाकी घरासमोर उभी करून बाहेर पडला  होता. दरम्यान, दुसर्‍या दिवसापासून त्याचा मोबाइलही बंद होता. तिसर्‍या दिवशी 4 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता हडको, एन- 11 येथील राष्ट्रवादी भवनजवळील वाळूच्या  ढिगार्‍यात त्याचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला खून करून मृतदेह वाळूच्याढिगार्‍यात पुरले असावे,  असा पोलिसांना  संशय होता. मात्र, साक्षीदार, सीसीटीव्ही फुटेज, मृताला झालेली जखम या सर्व बाबींचा तपास केला असता त्यात समाधान ढिगार्‍यावर झोपलेला असताना चालक शेख सलमान हा टिप्पर  (क्र. एमएच 20, डीटी 0069) मध्ये 2 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता वाळू घेऊन आला. त्याने निष्काळजीपणे टिप्पर जुन्या ढिगार्‍यावर रिचविले. यात ढिगार्‍यावर झोपलेल्या समाधानचा गुदमरून मृत्यू झाला, असे तपासात समोर आले. 

दरम्यान, या प्रकरणी मृताची पत्नी कांताबाई म्हस्के यांच्या फिर्यादीवरून सिडको ठाण्यात टिप्परचालकाविरुद्ध गुन्हा  नोंद करण्यात आला. ठिय्या मालक, टिप्परमालक आणि चालक या सर्वांना आरोपी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास उपनिरीक्षक सागर कोते करीत आहेत.