होमपेज › Aurangabad › शुभकल्याण मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील प्रकार

दीड कोटीच्या डीडींचा घोटाळा

Published On: Dec 30 2017 1:27AM | Last Updated: Dec 30 2017 1:27AM

बुकमार्क करा
औरंगाबाद ः प्रतिनिधी

न्यू गुलमंडीतील गोमटेश मार्केट येथील शुभकल्याण मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीत तब्बल एक कोटी 35 लाख रुपयांच्या डिमांड ड्राफ्टचा (डीडी) घोटाळा समोर आला. सोसायटीत पैसे जमा करून त्याबदल्यात घेतलेले डीडी बाऊन्स झाल्यानंतर हा प्रकार उघड झाला. या प्रकरणी क्रांती चौक आणि सिटी चौक पोलिस ठाण्यात सोसायटीच्या अध्यक्षांसह 14 जणांविरुद्ध दोन गुन्हे नोंद झाले असून यात पाच महिला आरोपींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, अशी अनेक प्रकरणे असल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला आहे. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमर घनश्यामदास कुकरेजा (40, रा. आदर्शनगर) यांनी क्रांती चौक ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी 3 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर या दरम्यान, शुभकल्याण मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीत अंदाजे 62 लाख 21 हजार 736 हजार रुपये जमा केले. त्याबदल्यात दहा डीडी घेतले. ते डीडी आपल्या बँकेत टाकले तर वटले नाहीत. त्यावर कुकरेजा यांनी सोसायटीत संपर्क साधला. त्यानंतर याच सोसायटीत कुकरेजा यांचे बचत खाते उघडून त्यात 20 लाख 9 हजार रुपये जमा दाखविले. मात्र, फेब्रुवारी 2017 मध्ये ही शाखा बंद झाली. त्यावर कुकरेजा यांनी अनेकदा तगादा लावूनही सोसायटीच्या अध्यक्ष व संचालकांनी त्यांना सतत उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेरीस अमर कुकरेजा यांनी या प्रकरणात पोलिसांत धाव घेतली.

सभासदांचे पैसे वैयक्‍तिक कामासाठी वापरले

गोपाल जुगलकिशोर जाजू (42, रा. गुलमंडी) यांच्या तक्रारीवरून सिटी चौक ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. त्यांनी 7 व 8 नोव्हेंबर रोजी या सोसायटीतून 72 लाख 88 हजार 440 रुपयांचे डीडी घेतले. ते ओळखीच्या अनेक व्यापार्‍यांना दिले. मात्र, हे डीडी बाऊन्स झाल्याचे सदर व्यापार्‍यांनी सांगितले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे समोर आले. हा प्रकार सोसायटीत विचारल्यावर त्यांनी ही रक्कम शंभुमहादेव शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि. आणि पिंगळे शुगर अँड अ‍ॅग्रो प्रॉडक्ट्स प्रा. लि. सेलू, ता. गेवराई, जि. बीड येथे वापरल्याचे समोर आल्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. 

हे आहेत आरोपी

शुभकल्याण सोसायटीचा अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक दिलीप शंकरराव आपेट, भास्कर बजरंग शिंदे, अजय दिलीपराव आपेट, नागिणीबाई बजरंग शिंदे, विजय दिलीपराव आपेट, कमलाबाई बाबासाहेब नखाते, शालिनी दिलीपराव आपेट, अभिजित दिलीपराव आपेट, प्रतिभा अप्पासाहेब आंधळे, आशा रामराव बिराजदार, बापूराव ज्ञानोबा सोनकांबळे, शिवकुमार गंगाधर शेटे (55, रा. कोल्हापूर) अशी गुन्हा नोंद झालेल्या आरोपींची नावे आहेत. यातील शिवकुमार शेटे याला सिटी चौक ठाण्याच्या सहायक निरीक्षक शैलजा जानकर-दराडे यांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने मंगळवारपर्यंत (2 जानेवारी 2018) पोलिस कोठडी सुनावली.