Sat, Aug 17, 2019 16:13होमपेज › Aurangabad › मनिषा वाघ हिचा खूनच; आरोपीला केली अटक 

मनिषा वाघ हिचा खूनच; आरोपीला केली अटक 

Published On: Feb 08 2018 1:53AM | Last Updated: Feb 07 2018 11:20PMराहुरी  : प्रतिनिधी

टाकळीमिया शिवारात अल्पवयीन मुलीचा सांगाडा सापडल्यानंर पोलिस प्रशासनाने 24 तासातच  खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.  संजय गोपीनाथ बर्डे (वय 37) असे आरोपीचे नाव असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. दरम्यान, मनिषा हिचा मृत्यू हिंस्त्र पशुने हल्ला केल्याने झाल्याच्या संशयाला पूर्णविराम मिळाला आहे.

टाकळीमिया भागातील मुसळवाडी तलावालगत असलेल्या उसाच्या फडात मनिषा रोहिदास वाघ (13 वर्ष) या अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला होता. डोेेके, हात व पाय कुजलेल्या  अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाला पाहून अनेक तर्कवितर्क काढले जात होते. पंधरा दिवसांपासून गायब असलेल्या मनिषाच्या मृत्यूबाबत तपास लावणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. 

श्रीरामपूर विभागाचे उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पो. नि. प्रमोद वाघ यांनी तपासाला गती दिली. स. पो. नि. सविता सदावर्ते, लक्ष्मण भोसले, दिलीप गायकवाड, शेलार, गौतम लगड, सतिष त्रिभूवन, बंडू बहिर, गणेश फाटक, गुलाब मोरे यांच्या पथकाने टाकळीमिया भागात दाखल होत अल्पवयीन मुलीच्या गायब होण्यापूर्वी घडणार्‍या घटनांची सविस्तर माहिती घेतली. 

दरम्यान, मनिषा वाघ गायब होण्यापूर्वी एका वीटभट्टीवर कामाला गेली होती. वीटभट्टी ठिकाणी आरोपी संजय बर्डे हा कामाला होता. तर ज्या दिवशी मनिषा गायब झाली तेव्हापासून संजय बर्डे हा देखील  4 दिवस गायब होता. यामुळे पोलिसांचा संजय बर्डे याच्यावर संशय वाढला. दि. 5 रोजी मनिषाचा मृतदेह सापडल्यानंतर दुसर्‍याच दिवशी संजय बर्डे यास पोलिसांनी ताब्यात घेतले. 

सुरुवातीला पोलिसांना उडवाउडवीचे उत्तरे देणार्‍या संजय बर्डे यास पोलिसांनी ‘तुम्ही दोघे जण टाकळीमिया बाजारातून सोबत गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे असल्याचे  सांगून जाळे फेकले. त्यात तो अलगद अडकला व  गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार, मनिषा हिला सोबत नेत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. परंतु मनिषाने विरोध करून आरडाओरडा केला. त्यामुळे आपले बिंग फुटेल. या भितीने आपण तिचा गळा दाबून खून केल्याची कबुली आरोपी संजय बर्डे याने दिली. 

पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

आरोपी संजय बर्डे याने खुनाची कबुली दिल्यानंतर 3 जणांनी खून करण्यात मदत केल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी संशयित तिघांची कसून चौकशी केली. दरम्यान, तिन्ही आरोपी कामकाजानिमित्त घटनेच्या दिवशी जिल्ह्याबाहेर होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली. आरोपी संजय बर्डे हा पोलिसांची दिशाभूल करीत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने याप्रकरणी पोपटासारखे तोंड उघडले.