Mon, Apr 22, 2019 16:21होमपेज › Aurangabad › नामविस्तार दिनानिमित्त कडक बंदोबस्त

नामविस्तार दिनानिमित्त कडक बंदोबस्त

Published On: Jan 14 2018 1:51AM | Last Updated: Jan 14 2018 12:09AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

शहरात विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. बंदोबस्तावर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्‍त पोलिस महासंचालक राजेंद्र सिंग यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. दरम्यान, शनिवारी पोलिसांनी विद्यापीठात मोठ्या फौजफाट्यासह पथसंचलन केले.

भीमा-कोरेगाव येथे घडलेल्या घटनेचे शहरात तीव्र पडसाद उमटले होते. यानंतर 4 जानेवारीपर्यंत शहरात तणावपूर्ण वातावरण झाले होते. त्यामुळे नामविस्तार दिनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पीईएस महाविद्यालयात शांतता समितीची बैठक झाली. त्यात ‘एक विचार-एक मंच’ असा निर्धार शहरातील दलित नेत्यांनी केला. याशिवाय केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांचा स्वतंत्र सभा मंडप डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात असणार आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्य राखीव बलाच्या दोन तुकड्या शहरात दाखल झाल्या आहेत. तसेच विद्यापीठ परिसरात सीसीटीव्ही पोलिस मदत केंद्र, ड्रोन कॅमेरा, स्वतंत्र नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहे. विशेष म्हणजे गृह खात्याच्या वतीने अतिरिक्‍त पोलिस महासंचालक राजेंद्रसिंग यांची बंदोबस्तावर नियंत्रण आणि योग्य सूचना करण्यासाठी नियुक्‍ती केली आहे. शनिवारी सायंकाळी राजेंद्रसिंग हे शहरात दाखल झाले. त्याशिवाय शहराची चांगली माहिती असलेले उपायुक्‍त वसंत परदेशी यांनाही बंदोबस्तासाठी बोलाविले आहे. दरम्यान, शनिवारी पोलिस आयुक्‍त यशस्वी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात पथसंचलन केले. यामध्ये राज्य राखीव पोलिस बलाच्या दोन तुकड्या, तीन उपायुक्‍त, पाच  सहायक पोलिस आयुक्‍त, 26 पोलिस निरीक्षक, 75 सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक, एक हजार 157 पोलिस कर्मचारी, 134 महिला व पुरुष होमगार्ड, दामिनी पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक, विशेष पोलिस अधिकारी, क्यूआरटी, दंगाकाबू पथक, वरुण वाहन यांचा समावेश होता.