Sun, Mar 24, 2019 12:26होमपेज › Aurangabad › पानीपत ही मराठ्यांची पराक्रम गाथा : विश्‍वास पाटील 

पानीपत ही मराठ्यांची पराक्रम गाथा : विश्‍वास पाटील 

Published On: May 28 2018 1:46AM | Last Updated: May 28 2018 12:02AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

तीन आठवडे उपाशी पोटी मराठा सैन्याने झाडपाला अन् उत्तरेतील पांढरी माती पोटात ढकलून शत्रू अहमद शहा अब्दालीच्या सैन्याला सळो की पळो केले; परंतु काही सरदारांनी युद्धाचं यंत्र-तंत्र आणि शिवरायांची शिस्त मोडली आणि पराजय पाहावा लागला. मात्र, असे असले तरी पानीपत युद्ध ही दुर्दैवी घटना नव्हे, तर मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा आहे. त्याचे चिरंतर जतन व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक पानीपतकार विश्‍वासराव पाटील यांनी केले.

बुलंद छावा मराठा युवा परिषद आणि शंभूराजे प्रतिष्ठान छत्रपती संभाजी महाराजांच्या 361 व्या जयंतीनिमित्त रविवारी (दि. 27) एमजीएम परिसरातील रुख्मिणी सभागृहात पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे होते. जे. के. जाधव,  अभिजित देशमुख, सुरेश वाकडे, सतीश वेताळ आदींसह संघटनेच्या पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती. विश्‍वासरावांनी पानीपत युद्धाचा रणसंग्राम श्रोत्यांसमोर अक्षरशः जिवंत केला. ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या नावाने उमलत्या फुलासारखी छाती फुगत नसेल आणि ‘पानीपत’चे नाव काढताच हृदय कोमेजत नाही, तो मराठी माणूस नाही. मराठवाडा आणि पानीपत युद्धाचा संबंध सांगताना परतूर येथून सदाशिवभाऊ सोबत फौजा उत्तरेत मार्गस्थ झाल्याचा दाखला दिला.
युद्धावर जाताना सेनानायक आणि सैन्यास धन दिले नाही, वेळीच अन्नधान्य आणि इतर रसद पुरवण्यात आली नाही. तीन आठवडे सैन्य लढत होते, ते केवळ जिद्दीच्या जोरावर. शिवाय अखेरच्या दिवशी दुपारपर्यंत मराठा सैन्य शत्रूवर चढाई करत होते. मात्र गायकवाड, होळकर सरदारांनी युद्धाचे यंत्र, तंत्र तोडले, शिवरायांची शिस्त मोडली आणि गारद्यांच्या तोफासमोर आपलेच सैन्य आल्याने तोफांचा मारा करता आला नाही. त्यामुळे पराजय स्वीकारावा लागला; परंतु अहमद शहा विजयी झाला असला तरी त्याने काढलेल्या विजयी जाहीरमान्यात मराठ्यांच्या पराक्रमाचे कौतुक केले.  
भाऊबंदकी नडली
पाटील यांनी इतिहासातील दाखले देत मराठी माणसाच्या मर्मावर बोट ठेवले. पानीपतसारख्या युद्धावर जाताना भाऊबंदकी आणि बेदीलीचा रोग घातक ठरला. सदाशिवभाऊंच्या अपशयासाठी पूजा केल्या गेल्या. त्यांना रसद दिली नाही. ते नायक ठरून दिल्‍लीत त्यांच्या ताब्यात जाईल, ते नायक ठरतील म्हणून त्यांच्या पायात बेडी घातली.