Tue, Jul 16, 2019 02:06होमपेज › Aurangabad › चारचाकी गाड्यांचे क्रमांक एका दमात सांगणारा अवलिया  

चारचाकी गाड्यांचे क्रमांक एका दमात सांगणारा अवलिया  

Published On: Jun 30 2018 1:57PM | Last Updated: Jun 30 2018 1:57PMशिऊर : सौरभ लाखे 

शिऊर परिसरातील खेड्यांची नावं, वैजापूर तालुक्यातील लोकप्रतिनिधींच्या गाड्यांचे क्रमांक, अष्टविनायक, ज्योतीलिंगसह महाराष्ट्रातील धार्मिक ठिकाणे न अडखळता एका दमात सांगणारे शिऊर येथील जाकिर पठाण सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. शिऊर ( ता.वैजापूर) येथील खालचा पाडा भागात राहणारे जाकिर पठाण हे गेल्या अठरा वर्षांपासून चारचाकी वाहन चालवितात या माध्यमातून राज्यभर ते फिरत असतात याचाच परिपाक म्हणून की काय ते राज्यभरातील धार्मिक ठिकाणे अवघ्या काही सेकंदात सांगतात. 

अशिक्षित असलेले जाकिर पठाण हे शिऊर बंगला येथे फळविक्रीचा व्यवसाय करत होते, नंतर गाडी व्यवसायात त्यांना आवड निर्माण झाल्याने ते या क्षेत्रात आले. त्यांची स्मरणशक्ती इतकी आहे की त्यांनी एकदा बघितलेले वाहन व त्याचा क्रमांक ते केव्हाही सांगू शकतात. वैजापूर तालुक्यातील सर्व राजकारणी आणि लोकप्रतिनिधींसह शिऊर गावातील  चारचाकी वाहनांचे क्रमांक त्यांच्या मुखोदगत आहेत. एवढ्यावरच हा अवलिया थांबला नसून राज्यभरातील विविध भागात बोलली जाणारी बोली भाषा ते अलगद बोलतात. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, खान्देश, या भागातील भाषेसह कर्नाटक मध्ये बोलली जाणारी कानडी भाषा देखील ते सहजतेने बोलतात. 

 या हरहुन्नरी  कलेने ते शिऊरसह तालुक्यात परिचित आहेत.