Thu, Apr 25, 2019 17:51होमपेज › Aurangabad › दोनदिवसीय नुक्‍कड साहित्य संमेलन 

दोनदिवसीय नुक्‍कड साहित्य संमेलन 

Published On: Jan 02 2018 12:58AM | Last Updated: Jan 02 2018 12:20AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

न लिहिलेली पत्रे आणि नुक्‍कड कथा लेखकांचे दुसरे साहित्य संमेलन औरंगाबाद शहरात दि. 6 व 7 जानेवारी रोजी आयोजित केले आहे, अशी माहिती बुक हंगामाचे सहसंस्थापक विक्रम भागवत यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी (दि. 1) दिली

दोनदिवसीय हे साहित्य संमेलन रेल्वेस्टेशन रोडवरील पुष्पक मंगल कार्यालयात होणार आहे. शनिवारी (दि. 6)  सकाळी 11 वाजता संमेलनाचे उद्घाटन व पुस्तक प्रकाशन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्या हस्ते करण्यात येणार असून त्यांचे बीजभाषणही होणार आहे. यावेळी डॉ. माधवी वैद्य व विक्रम भागवत यांची उपस्थिती असणार आहे. दुपारी 2 ते 3.30 यावेळेत पहिले चर्चासत्र ‘कथा, आशय, विषय आणि आकृतिबंध’ या विषयावर होणार आहे.

त्यात गणेश कनाटे, शशी डंभारे, संजन मोरे, मेघा देशपांडे, विनया पिंपळे, शिरीष कुलकर्णी, सुवर्णा पावडे यांचा सहभाग असेल. दुपारी 4 ते 6 दरम्यान नुक्‍कड पुरस्कार वितरण सोहळा डॉ. सुधीर रसाळ, बाबा भांड, रा. रं. बोराडे, अंजली धानोरकर यांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी 6.30 ते 8 या वेळेत डॉ. माधवी वैद्य आणि कलाकार बहिणीबाईंच्या कविता सादर करतील.

रविवारी (दि. 7) सकाळी 9 वाजता लेखकांसाठी डिजिटल मार्केटिंग या विषयावर सोहम सबनीस हे माहिती देतील. तर 10.30 ते 11.30 या वेळेत आयडिया टु बुक-लेखनाचा प्रवास या विषयावर विक्रम भागवत हे बोलतील. त्यानंतर नुक्‍कड कथा अभिवाचन 12 ते 1.30 या वेळेत होईल. त्यात संगीता कुलकर्णी, अक्षय वाटवे, केतकी करंदीकर व कलाकार सहभागी होतील. कार्यक्रमाचा समारोप दुपारी 2.30 ते 3.30 या वेळेत होईल.